*कोकण Express*
*गावाच्या विकासासाठी भाजप शिवाय पर्याय नाही म्हणूनच 7 ग्रा.पं.सरपंच निवड बिनविरोध*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कणकवली तालुक्यातील भाजपाच्या असलेल्या व बिनविरोध निवडी झालेल्या 7 सरपंचांचा आमदार नितेश राणे यांनी कणकवलीत ओम गणेश निवासस्थानी सत्कार करत त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. तसेच त्यांच्यासोबत बिनविरोध निवड झालेल्या ग्रामपंचायतींचे सदस्य यांचा देखील आमदार नितेश राणे यांनी सत्कार करत पेढे भरवत त्यांचे अभिनंदन केले. या निवडीमुळे आता तुमची जबाबदारी वाढली असून, यापुढे अजून जोरात काम करा. गावाकडून तुमच्याकडे अपेक्षा वाढल्या आहेत. असे प्रतिपादन आमदार नितेश राणे यांनी याप्रसंगी केले.
कणकवली तालुक्यातील 7 सरपंच व एकूण 100 ग्रामपंचायत सदस्य भाजपाचे बिनविरोध निवडून आल्याचेही याप्रसंगी आमदार नितेश राणे यांनी सांगितले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात 250 पेक्षा जास्त भाजपाच्या ग्रामपंचायती निवडून येतील असा विश्वास देखील यावेळी आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केला. गेल्या साडेपाच महिन्यांमध्ये बाळासाहेबांची शिवसेना व भारतीय जनता पक्ष यांनी एकत्रित रित्या केलेल्या कामामुळे लोकांचा आमच्यावर आता विश्वास वाढला असून, अपेक्षा देखील वाढल्या आहेत. व जनतेला विकास हवा आहे. गावचा विकास करायचा असेल तर भाजपा शिवाय पर्याय नाही हे या सातही ग्रामपंचायत मध्ये लोकांनी ठरवल्यामुळेच हे सरपंच व ग्रामपंचायत बिनविरोध झाल्याचे देखील ते यावेळी म्हणाले. बाळासाहेबांची शिवसेना व भाजपा हे अनेक गावांमध्ये आम्ही युतीधर्म पाळत एकत्रित निवडणुका लढवत आहोत. कणकवली मतदारसंघात विरोधकांना एक आकड्याच्या आसपासच राहावे लागेल. दोन आकडी संख्या विरोधक पाहूच शकत नाही. अशी स्थिती असल्याचा विश्वास देखील आमदार नितेश राणे यांनी याप्रसंगी व्यक्त केला. यावेळी आमदार नितेश राणे यांच्यासोबत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष गोट्या सावंत, वारगाव सरपंच नम्रता शेट्ये, साकेडी सरपंच सुरेश साटम, शीडवणे सरपंच रवींद्र शेट्ये, पिसेकामते सरपंच प्राजक्ता मुद्राळे, करूळ सरपंच समृद्धी नर, यांच्यासह या सर्वच ग्रामपंचायतींचे बिनविरोध झालेले सदस्य व त्यांच्यासह भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, माजी बांधकाम सभापती रवींद्र जठार, माजी सभापती दिलीप तळेकर, संतोष कानडे, साकेडी सरपंच रीना राणे, यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.