*कोकण Express*
*तळेरे येथील ‘मधुकट्टयाचे’ पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या हस्ते अनावरण*
*कासार्डे ;संजय भोसले*
“मधुकट्टया” च्या माध्यमातून मधुसूदन नानिवडेकर यांची एक सुंदर स्मृती जागवून हे एक मोठी साहित्यिक चळवळ सुरु केली आहे.यातुन आपण सर्वजण मधूवरती निस्सीम प्रेम करणारे आहात हे लक्षात येते, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी तळेरे येथे केले.
तळेरे येथील ‘मधुकट्टा’ च्या अनावरण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी नाट्य लेखक प्रा. प्रदीप ढवण, जेष्ठ पत्रकार शशी सावंत, तळेरे व्यापारी संघटनेचे अध्यक्ष राजू जठार, संवाद परिवार संस्थापक डॉ.मिलिंद कुलकर्णी,डॉ.ऋचा कुलकर्णी आदी उपस्थित होते.
यावेळी मधुसूदन नानिवडेकर यांच्या नावाने सुरु झालेल्या ‘मधुकट्टा’ चे अनावरण मधु मंगेश कर्णिक यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन करण्यात आले. यावेळी मधु मंगेश कर्णिक यांना प्रा. प्रदीप ढवण आणि राजू जठार यांच्या हस्ते शाल,पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना कर्णिक म्हणाले की, कविता करणे म्हणजे वीज पकडणे.ती विज मधुसूदन नानिवडेकर यांनी अचुक पकडली होती.त्यामुळे त्यांच्या निधनानंतर नानिवडेकर यांच्याबद्द्ल लिहिणे त्यामागे फक्त प्रेम व कृतज्ञता व्यक्त केली.याठिकाणी कोमसापची शाखा निर्माण करुन ही साहित्यिक चळवळ अधिक वृध्दींगत करुयात असे सांगितले.
यावेळी प्रा.प्रदीप ढवण म्हणाले की,स्व.नानिवडेकर हे खूप प्रतिभावंत कवी,गझलकार म्हणून सर्वत्र परिचित होते.त्यांनी रसिकांच्या मनावरती अधिराज्य केले.त्यांचा खूप वेळा सहवास लाभला असा साहित्यिक होणे नाही.मधुभाई कर्णिक तसेच स्व.नानिवडेकर यांची मनाची श्रीमंती आणि आयुष्यात खूप माणसे जोडली तिच त्यांची खरी संपत्ती होती.
शशी सावंत यांनी स्व.मधुसुदन नानिवडेकर यांच्या अकाली निधनाने एका कवी,गझलकार मित्राला आपण सगळेजण मुकल्याची खंत व्यक्त केली.तसेच नानिवडेकर यांच्या पश्चात ही साहित्यिक चळवळ पुढे नेण्यासाठी तळेरे येथे डॉ.मिलिंद कुलकर्णी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी संवाद परिवाराच्या माध्यमातून मधुकट्टयाची निर्मिती करुन त्यांचा वारसा जोपासण्यासाठी सर्वांची तळमळ पाहून खूप समाधान वाटल्याचे सांगितले.तसेच यावेळी त्यांनी नानिवडेकर यांच्या आठवणी जाग्या केल्या.
या कार्यक्रमाला तळेरे, कासार्डे मधील साहित्य रसिक व संवाद परिवारातील सदस्य उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.मिलिंद कुलकर्णी यांनी केले.