*कोकण Express*
*“लेटलतिफ” बांधकाम अधिकाऱ्यांचा मनसेकडून निषेध…*
*खुर्च्यांना पुष्पहार अर्पण करून कुडाळमध्ये अनोखे आंदोलन;
*कुडाळ ः प्रतिनिधी*
येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी नेहमीप्रमाणे आजही १२ वाजेपर्यंत कार्यालयाच्या वेळेत उपस्थित नसल्याने या लेटलतिफ व बेजबाबदार कारभाराच्या विरोधात मनसे पदाधिकाऱ्यांनी वेगळे आंदोलन करत,उपअभियंता व शाखा अभियंता यांच्या खुर्च्यांना पुष्पहार अर्पण करून निषेध केला.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बेजबाबदार व मनमानी कारभाराविरोधात मंगळवारी कुडाळ मनसे पदाधिकाऱ्यांनी कार्यालयात अनपेक्षितपणे हजेरी लावत कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेतलेली होती. यावेळी कर्मचारी कार्यालयात उपस्थित नसल्याचे दिसून आले होते.दरम्यान यासंदर्भात गुरुवारी मनसे शिष्टमंडळाशी चर्चा करण्याचे आश्वासन उपविभागीय अभियंता अनामिका जाधव यांनी दिले होते.मात्र नेहमीप्रमाणेच कार्यालयात एकही कर्मचारी उपस्थित नव्हता. फक्त शिपाई दप्तर उघडून बसले होते.यासंदर्भात बारा वाजेपर्यंत मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांची वाट बघूनही अधिकारी कार्यालयात उपस्थित झाले नाहीत.त्यामुळे बेजबाबदार कारभाराचा निषेध केला.