*कोकण Express*
*“त्या” २१ आरोग्य सेविकांचा प्रश्न मार्गी…*
*आमदार नितेश राणे यांच्या पाठपुराव्याला यश…*
*कणकवली ः प्रतिनिधी*
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत सेवामुक्त करण्यात आलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २१ आरोग्य सेविकांचा प्रश्न आमदार नितेश राणे यांच्या पाठपुराव्यातून मार्गी लागला आहे. सेवेतून कमी केलेल्या या आरोग्य सेविकांना रिक्त पदांवर समायोजन करण्याचा आदेश शासनाने आदेश जारी केला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २१ तर राज्यातील ५९७ आरोग्य सेविकांचे समायोजन करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.काही दिवसांपूर्वीच जिल्ह्यातील सेवा मुक्त झालेल्या २१ आरोग्य सेविकांनी आमदार नितेश राणे यांची भेट घेतली होती. यावेळी सेवा समाप्तीचे आदेश दिलेल्या कंत्राटी आरोग्य सेविकांना पुन्हा सेवेत घ्यावे अशी मागणी आरोग्य सेविकांनी केली होती. तर श्री.राणे यांनी शासनस्तरावर पाठपुरावा करण्याची ग्वाही दिली होती. दरम्यान २१ आरोग्य सेविकांच्या सेवा समाप्तीमुळे जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेवरही ताण निर्माण झाला होता.
या आरोग्य सेविकांच्या प्रश्नाबाबत श्री.राणे यांनी राज्याचे आरोग्य मंत्री व संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून पाठपुरावा केला. त्यानंतर शासनाने २९ नोव्हेंबरला अध्यादेश जारी केला. यात राष्ट्रीय आरोग्य अभियानंतर्गत जिल्ह्यातील २१ आरोग्य सेविकांसह राज्यातील कमी केलेल्या ५९७ आरोग्य सेविकांना रिक्तपदावर समायोजन करण्याचे नमूद करण्यात आले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आरोग्य सेविकांची ११२ मंजूर पदे आहेत. तर सेवा समाप्तीचे आदेश दिलेली २१ पदे असल्याने, सेवा जेष्ठता यादीनुसार रिक्त पदावर या आरोग्य सेविकांचे समायोजन होणार आहे. या निर्णयाबद्दल जिल्ह्यातील त्या सर्वच आरोग्य सेविकांकडून समाधान व्यक्त करण्यात आले आहे.