*कोकण Express*
*व्यावसाईक दृष्टिकोन ठेवून शेती करणे गरजेचे;कृषी अधिकारी दिवेकर*
*कासार्डे ;संजय भोसले*
शेती व शेती पुरक व्यवसाय करीत असतांना त्यामध्ये व्यावसायिक दृष्टीकोन ठेऊन आणि सतत नवनवीन प्रयोग करीत राहून शेती पिकांमध्ये बदल करणे गरजेचे आहे.शेतकऱ्यांना परिपूर्ण आणि योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी स्व.सुनील तळेकर ट्रस्ट नेहमी प्रयत्न करत आहे.अशा प्रकारच्या मेळाव्यांचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घेऊन आर्थिक समृध्दी साधली पाहिजे असे प्रतिपादन जिल्हा कृषी अधिकारी श्री.दिवेकर यांनी केले.
स्व.सुनील तळेकर चॅरिटेबल ट्रस्ट तळेरेच्या वतीने स्व.सुनील तळेकर यांच्या पंचविसाव्या स्मृती दिनाचे औचित्य साधून विठ्ठल मंदिर तळेरे गावठण येथे शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता.याप्रसंगी जिल्हा कृषी अधिकारी श्री.दिवेकर बोलत होते.
याप्रसंगी तालुका कृषी अधिकारी सौ.मुळे,प्रगत शेतकरी प्रसाद देवधर,सांगली येथील नैसर्गिक शेती तज्ञ यल्लापा माळी,ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश तळेकर,वाचनालयाचे संस्थापक अध्यक्ष रमाकांत वरुणकर,वाचनालयाचे अध्यक्ष विनय पावसकर,श्रीनिवास पळसुले,डी.एस.पाटील व इतर कृषी अधिकारी उपस्थित होते.
कृषी अधिकारी श्री.दिवेकर यांनी व्यावसायिक उद्योजक बनवण्यासाठी अनुदान कर्ज योजनांची माहिती तसेच विविध कृषी विमा योजना विषयी मार्गदर्शन केले.मिरची ॲप,महाडीबिटी ॲप याविषयीची माहिती दिली.गेल्या तीन वर्षात यांत्रिकी करण कर्ज वितरण रक्कम ४ लाख ते ४ कोटी पर्यंत वितरित करून सिंधुदुर्ग कृषी विभाग आघाडीवर आहे असे त्यांनी यावेळी सांगितले.
तर विजयदुर्ग येथील प्रसिद्ध आंबा उत्पादक शेतकरी,गिरगाई दूध व्यावसायिक तसेच सरपंच प्रसाद देवधर यांनी शेतकरी मेळाव्याला गिर गाईचा आंबा उत्पादन शेतीमध्ये कसा किफायतशीर फायदा होतो हे स्वतः प्रयोगशील शेतकरी असल्याने या विषयावरती उत्तम माहिती उपस्थित शेतकऱ्यांना दिली.त्याचबरोबय आंबा उत्पादन वाढीमध्ये जिवांमृतचा उपयोग,पिकांच्या उत्पादनात झालेली चांगली वाढ व मार्केटिंग पद्धतीवरती विस्तृत माहिती दिली.तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधून प्रश्नांना उत्तरे दिली.
तसेच सांगली येथील नैसर्गिक शेती तज्ञ यल्लापा माळी यांनी जमीनीची सुपीकता वाढीसाठी पंचगव्य वापर कसा करावा यावर मार्गदर्शन केले.बागेमध्ये फिरून झाडाशी बोलल्याशिवाय त्यांची वाढ होणार नाही.तसेच शेतीकडे व्यावसायिक दृष्टीने पाहणे आणि काळानुरूप अपेक्षित बदल करण्याची गरज व्यक्त केली.
मेळाव्याचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते स्व.सुनील तळेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली.शेतकऱ्यांनी कार्यक्रमा अंतर्गत भाग घेतला ७५ वर्ष पूर्ण झालेल्या व्यक्तींचे अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त सत्कार करण्यात आले.
या कार्यक्रमाला तळेकर ट्रस्ट व वाचनालयाचे पदाधिकारी,ज्येष्ठ नागरिक संघ पदाधिकारी तसेच पंचक्रोशीतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्रीनिवास पळसुले यांनी केले.तर शेवटी आभार विनय पावसकर यांनी मानले.