*कोकण Express*
*तब्बल ५ लाख रुपये किमतीचा गोवा बनावटीचा दारू साठा जप्त…*
*कोल्हापूर विभागीय भरारी पथकाने छापा टाकून मुद्देमाल केला जप्त*
*बांदा ःःप्रतिनिधी*
राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या कोल्हापूर विभागीय भरारी पथकाने कोल्हापूर शहरात छापा टाकून गोवा बनावटीच्या विदेशी मद्याचा तब्बल ५ लाख ३ हजार ४० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी रोहित श्रीकांत मांगुरे (वय २७, रा. कसबा बावडा, कोल्हापूर, ता. करवीर, जि. कोल्हापूर) यास अटक करण्यात आली.
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्कचे राज्य आयुक्त कांतीलाल उमाप यांच्या आदेशानुसार दक्षता व अंमलबजावणी विभागाचे संचालक सुनिल चव्हाण, कोल्हापूर विभागीय उपआयुक्त डॉ. बी. एच. तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर विभागीय भरारी पथकाने केली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, कोल्हापूर शहरात बेकायदा गोवा बनावटीच्या मद्याचा साठा करून ठेवण्यात आल्याची गोपनीय माहिती विभागीय भरारी पथकाला मिळाली होती. त्यानुसार महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ चे अंर्तगत छापा टाकण्यात आला. त्यावेळी अवैध मद्याचा साठा मिळून आला. त्यामध्ये कागदी पुठ्ठयाच्या खोक्यामध्ये फक्त गोवा राज्यात विक्रीकरीता असलेले भारतीय बनावटीचे विदेशी मद्य विविध ब्रॅन्डच्या ७५० मिली मापाच्या एकूण ७८० सिलबंद काचेच्या व प्लॅस्टीकच्या बाटल्या, १८० मिलीच्या एकूण ३८४ सिलबंद काचेच्या व प्लॅस्टीकच्या बाटल्या असे एकूण ७३ खोके जप्त करण्यात आले. एकूण ५ लाख ३ हजार ४० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही विभागीय भरारी पथकाचे निरीक्षक एस. जे. डेरे, आर. जी. येवलुजे, एस. एस. गोंदकर, दुय्यम निरीक्षक श्रीमती उमा पाटील, कॉन्स्टेबल अमोल यादव, विलास पवार, सुशांत बनसोडे, दिपक कापसे, मोहन पाटील, श्रीमती सविता देसाई यांच्या पथकाने केली. पुढील तपास दुय्यम निरीक्षक आर. जी. येवलुजे करत आहेत.