*कोकण Express*
*नॅशनल इंग्लिश मेडियम स्कूल नडगिवे येथे विविध उपक्रमानी भारतीय संविधान दिन साजरा*
*कासार्डे;संजय भोसले*
आदर्श एज्युकेशन सोसायटी खारेपाटण संचलित नडगिवे येथील नॅशनल इंग्लिश मेडियम स्कूलमध्ये भारतीय संविधान दिन ( नॅशनल कॉन्स्टिट्यूशन डे) विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
२६ नोव्हेंबर रोजी भारतीय संविधान दिवस असतो. यानिमित्त आदर्श एज्युकेशन सोसायटी खारेपाटणच्या नडगिवे येथील नॅशनल इंग्लिश मेडीयम स्कूलमध्ये विविध उपक्रम आयोजित करण्यात आले. या अंतर्गत भारतीय राष्ट्रगीत व प्रतिज्ञा यांचे सामुदायिक उद्घोषण होऊन संविधान दिनाच्या कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. या कार्यक्रमांतर्गत विद्यालयातील इयत्ता नववीतील ओम निवास पाटील या विद्यार्थ्याने आपल्या ओघवत्या शैलीत भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेचे वाचन केले तसेच शुभंकर सुधीर कुबल या दहावीतील विद्यार्थ्यांने लक्षवेधी भाष्यकलेने भारतीय संविधानाच्या माहितीचे अभिवाचन केले.
विद्यालयांतर्गत राष्ट्रीय संविधान दिनानिमित्त पहिली ते दहावी इयत्तेतील विद्यार्थ्यांची इयत्तेवार तीन गटात हस्ताक्षर स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेमधील विजेते स्पर्धक पुढील प्रमाणे.
प्रथम गट (इयत्ता पहिली ते चौथी): प्रथम क्रमांक- कांचन लक्ष्मण आडुळकर (इयत्ता चौथी), द्वितीय क्रमांक- सान्वी महादेव मोटे (इयत्ता दुसरी), तृतीय क्रमांक- शुभ्रा राजेंद्र चिके (इयत्ता तिसरी), दुसरा गट (इयत्ता पाचवी ते सातवी): प्रथम क्रमांक- आयेशा मोहज्जम पटेल (इयत्ता सहावी), द्वितीय क्रमांक- स्वरा दिगंबर सावंत ( इयत्ता सहावी), तृतीय क्रमांक- शामिका महेश निग्रे (इयत्ता सातवी), तिसरा गट (इयत्ता आठवी ते दहावी): प्रथम क्रमांक- शुभंकर सुधीर कुबल (इयत्ता दहावी), द्वितीय क्रमांक- नील मंगेश लोकरे (इयत्ता नववी) आणि तृतीय क्रमांक- जरीफअहमद हनीफ काझी (इयत्ता दहावी). या सर्व विजेत्या स्पर्धकांचे आदर्श एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. मनोजजी गुळेकर यांनी तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. सरदारजी निकम यांनी अभिनंदन करून सर्वांना शुभेच्छा दिल्या.
संविधान दिनानिमित्त झालेल्या वक्तव्यात विद्यालयाचे मुख्याध्यापक सरदारजी निकम यांनी भारतीय संविधानाचे महत्त्व प्रतिपादन करून सर्वांनी या संविधानाचा आदर करावा असे आवाहन केले. विद्यालयाचे सहशिक्षक राधेश्याम पांडेय यांनी भारतीय संविधानाबाबत माहिती देताना भारतीय संविधान हे न्याय, समता, बंधुत्व आणि व्यक्ती स्वातंत्र्य या मूल्यांवर आधारित असून जगातील अनेक राष्ट्रांच्या संविधानांचा अभ्यास करून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी हे संविधान साकारल्याचे सांगितले. कार्यक्रमादरम्यान २६ नोव्हेंबर, २००८ रोजी दहशतवाद्यांनी मुंबईत केलेल्या अमानुष भ्याड हल्ल्यात हौतात्म्य प्राप्त झालेल्या वीरांचे विद्यालयाचे सहशिक्षक ओंकार गाडगीळ यांनी आपल्या अभिभाषणातून आदरपूर्वक स्मरण करविले. याप्रसंगी दहशतवाद्यांशी लढताना वीरत्व प्राप्त झालेल्या सर्व हुतात्म्यांना कृतज्ञतापूर्वक हृद्य श्रद्धांजली वाहण्यात आली.