*कोकण Express*
*प.पू.भालचंद्र महाराज यांच्या पुण्यतिथी उत्सवास भक्तीमय वातावरणात प्रारंभ*
*भालचंद्र महारुद्र महाअभिषेक अनुष्ठान विधीने सुरुवात…!*
*धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे पाच दिवस आयोजन…!*
*कणकवली ः प्रतिनिधी*
योगीयांचे योगी, असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान, कनकाधिपती परमहंस भालचंद्र महाराज यांच्या ४५ वा पुण्यतिथी महोत्सव भक्तीमय वातावरणात प्रारंभ झाला. महोत्सवानिमित्त कीर्तन महोत्सवासह विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे पाच दिवस आयोजन केले आहे. पहाटे समाधी पूजन आणि काकड आरतीने भालचंद्र महाराज यांच्या पुण्यतिथी उत्सवाची सुरुवात झाली. काकड आरतीला मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.
त्यानंतर सकाळी ब्रह्मवृंदांच्या मंत्रोपचारात भालचंद्र महारुद्र महाअभिषेक अनुष्ठान पार पडला. विनायक नाईक व सौ. नाईक या यजमानांच्या हस्ते पूजा करण्यात आली. यावेळी परमहंस भालचंद्र महाराज संस्थांनचे अध्यक्ष सुरेश कामत, व्यवस्थापक विजय केळुसकर, श्री देव काश्वीविश्वेश्वर देवस्थान कमिटीचे अध्यक्ष अँड. प्रवीण पारकर, गजानन उपरकर,प्रसाद अंधारी, विजय पारकर,बंडू खोत, विवेक वाळके, निवृत्ती धडाम, भरत उबाळे,यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दुपारच्या सत्रात भालचंद्र महाराज यांची आरती झाली. त्यानंतर महाप्रसादाचा भाविकांनी लाभ घेतला.
महोत्सवाच्या पहिला दिवशी भजनी बुवांनी भजने सादर करून वातावरण भक्तीमय केले. सायंकाळच्या सत्रात ह. भ. प. श्रेयस मिलिंद बवडे यांचे ‘श्रीकृष्ण रुक्मीणी स्वयंवर’ या विषयावरील कीर्तनाने कीर्तनास प्रारंभ झाला आहे. श्री. बवडे यांचे कीर्तन ऐकण्यासाठी भाविकांची लक्षणीय उपस्थित होती. भालचंद्र महाराज यांच्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त संस्थान परिसरात रंगरंगोटी व आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. तसेच भालचंद्र महाराज यांच्या समाधीस्थान फुलांनी सजविण्यात आले आहे.