*कोकण Express*
*एस्.टी.च्या ताफ्यातील पहिली “BS-6” बस*


आपणा सर्वांना कल्पना असेलच की गेल्या काही दिवसात एस्.टी.च्या ताफ्यात नव्या कोऱ्या “BS-6” बसेसचा समावेश झाला आणि त्या प्रवासी सेवेत धावू लागल्या आहेत.
“सार्वजनिक”–खाजगी भागीदारी माध्यमातून एस्.टी. महामंडळात पहिल्यांदाच “साध्या बसेस”चा अशा प्रकारे समावेश केला गेला असून, महाराष्ट्रातील विविध भागात सदर बसेस अशा पद्धतीने चालवण्याचा एस्.टी. महामंडळाचा मानस आहे असे दिसते. ऑक्टोबर महिन्यात लातूर येथे सदर बसेसचा श्रीगणेशा केला गेला असून, सद्यस्थितीत कोल्हापूरातील इचलकरंजी डेपोच्या विविध मार्गावर सदर बसेसचे चालन सुरु असल्याचे समजते.
२०१९ साली एसटी महामंडळात “BS-4” बसेसचे आगमन झाले, त्यानंतर तब्बल ३ वर्षांनी म्हणजेच २०२२ सालच्या उत्तरार्धात नव्या “BS-6” बसेसचे आगमन झाल्याने एस्.टी. महामंडळ आणि विशेषकरून प्रवासी वर्गात आनंदाचे वातावरण पसरल्याचे पहावयास मिळते.
एसटीच्या ताफ्यात समाविष्ट झालेल्या नव्या कोऱ्या “BS-6” बसेसची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे :-
१) २०१९ साली “BS-4” प्रकारातील लाल/पांढरी तसेच विठाई बसप्रमाणेच, सदरची “BS-6” बस ही ‘साधी बस’ म्हणूनच महामंडळात समविष्ट झालेली आहे.
२) आधीच्या साध्या बसला असणारा लाल/पांढरा रंग बदलून महामंडळाने आता पूर्वीच्या परिवर्तन बसप्रमाणे संपूर्ण लाल रंग बसला देण्याचे प्रयोजन केले आहे, त्यामुळे आता आलेली बस ही संपूर्ण लाल रंगात आहे.
३) सदर बसमध्ये केलेल्या एकूण बदलांपैकी २ बदल हे अत्यंत महत्त्वाचे असून, साध्या बसमध्ये प्रवासी सेवेचा दर्जा उंचावण्यासाठी पहिल्यांदाच हे बदल केले आहे असे समजते. अ) सदर बसला एशियाड /शिवशाही /शिवनेरी बसप्रमाणे पुशबॅक सीट्स देण्यात आलेल्या आहेत. ब) प्रत्येक प्रवाश्यास मोबाईल चार्जिंगसाठी USB चार्जिंगची सीटजवळच सोय देण्यात आलेली आहे.
या आधी साध्या बसमध्ये अशा सुविधा कधीच उपलब्ध केल्या जात नव्हत्या, पण अशा सुविधांमुळे प्रवाशी वर्गास कमी दरात चांगली सेवा देण्याचे प्रयोजन महामंडळ आता करत आहे, असे दिसते.
४) सदर बसला वेगळे केबिन नसून, प्रवासी दरवाजा “BS-4” बसप्रमाणे पुढेच आहे, पण या “BS-6” बसमध्ये सदरचा प्रवासी दरवाजा हा आत/बाहेर उघडणाऱ्या प्रकारातील आहे. (दरवाजा उघड/बंद करण्याचे सर्व कंट्रोल चालकाकडे आहे.)
५) आपत्कालीन खिडकी बसमध्ये पूर्वी उजव्या बाजूस पाठीमागे किंवा पुढे असायची, पण सदरच्या बसमध्ये हीच आपत्कालीन खिडकी/दरवाजा हा स्लीपर बसप्रमाणे पाठीमध्ये मध्यभागी दिलेला आहे. त्यामुळे पाठीमागे शेवटच्या रांगेत मध्यभागी कोणतीही सीट लावलेली नसून, शेवटच्या रांगेत देखील ५ च्या ऐवजी फक्त ४ सीट्सच लावलेल्या आहेत.
६) अधिक सुरक्षिततेसाठी बसमध्ये FDSS (फायर डिटेक्शन अंड सेपरेशन सिस्टीम), हुटर, पॅनिक बटण, हातोडी,प्रथमोपचार पेटी, माहिती देण्यासाठी स्पीकर इत्यादीची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
७) बसच्या पाठीमागील भागात समान ठेवण्यासाठी कोणतीच व्यवस्था केलेली नसून, बसच्या बाजूला यासाठी एक कप्पा करण्यात आलेला आहे.
८) आयशर चेसीवर, MG कंपनी (बेळगाव) येथून बांधणी करण्यात आलेल्या “या” बसेस एस्.टी. महामंडळाने स्वतः विकत घेतलेल्या नसून “सार्वजनिक”–खाजगी भागीदारी मार्फत चालवल्या जात आहेत.
यामध्ये प्रामुख्याने १) गाडी ऑपरेटरची, २) चालक ऑपरेटरचा आणि ३) गाडीची देखभाल देखील ऑपरेटरनेच पहावयाचे आहे.
९) किलोमीटरप्रमाणे दर देऊन ठराव करण्यात आलेल्या सदर बसेच्या चालनात वाहक (कंडकटर) मात्र महामंडळाचाच असतो.
१०) लातूर, कोल्हापूर नंतर भविष्यात पुणे, सांगली, रायगड, रत्नागिरी, धुळे इत्यादी भागात सदर बसेस टप्प्या टप्प्याने चालू करण्याची माहिती महामंडळाकडून मिळते.
११) “सार्वजनिक”–खाजगी भागीदारीच्या बसेस जशा महामंडळात समाविष्ट होत आहेत, अगदी तशाच महामंडळ स्वतःच्या मालकीच्या बसेस देखील काही दिवसात समाविष्ट करणार आहे.
१२) एसटी महामंडळाने ७०० टाटा चेसीस विकत घेतल्या असून, एस्.टी.च्या पुणे, औरंगाबाद, नागपूर येथील मध्यवर्ती कार्यशाळेत या बसेसची निर्मिती सुरु केलेली आहे.
आपण जर या बसने कधी प्रवास केला असेल तर आपला प्रवासानुभव नक्की शेअर करा !
धन्यवाद !