*कोकण Express*
*स्वतःचे मन सक्षम असेल तर यश आपोआप मिळते – डॉ. हेमंत पेडणेकर*
*फोंडाघाट ः प्रतिनिधी*
फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीचे, ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स, सायन्स अँड व्होकेशनल फोंडाघाट येथे, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षेला सामोरे जाताना अर्थात परीक्षा आणि आयुष्यात भरपूर यश देणारा सोपा विषय – भूगोल या विषयावर मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून, बालभारतीचे लेखक, माझी प्राचार्य डॉ. हेमंत पेडणेकर हे होते. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक श्री शंकर सावंत तसेच सीनियर महाविद्यालयाचे भूगोल विभाग प्रमुख प्रा. डॉ. आर. बी. पाटील आणि ज्युनिअर कॉलेजचे भूगोल विभाग प्रमुख प्रा. ज्ञानदेव फड हे उपस्थित होते.
मार्गदर्शनपर भाषणात डॉ. हेमंत पेडणेकर यांनी, विद्यार्थ्यांच्या मनातील परीक्षेविषयी भीती दूर करण्यासाठी अनेक लहान – लहान गोष्टी तसेच उदाहरणे दिली. अभ्यास कसा करावा, केलेला अभ्यास लक्षात कसा ठेवावा, प्रत्येक गोष्टीचा आपल्या जीवनामध्ये कसा उपयोग करावा, लहान वयामध्ये अधिक परिश्रम घेतले तर भावी आयुष्य कसे सुखकर होते, याविषयी अनेक उदाहरणे देऊन विद्यार्थ्यांना पॉझिटिव्ह विचार करण्याचा सल्ला दिला. त्याशिवाय कठीण कामे प्रथम करा म्हणजे इतर सर्व मार्ग सोपे होतात. अंतर्गत मनापेक्षा बहिर्गत मन शांत असेल, तरच आपले सर्व सुप्त गुण बाहेर येतील व जीवन सुखकर होईल. यावेळी प्रमुख पाहुण्यानी विविध शैक्षणिक साधनांचा संच संस्थेस भेट दिला.
अध्यक्षीय भाषणामध्ये मुख्याध्यापक श्री शंकर सावंत म्हणाले, विद्यार्थी हा शिस्तप्रिय असतो. नियोजनानुसार आपली कामे करत असतो. म्हणूनच त्यांच्या क्षमतेचा निकाल हा परीक्षेमधून मिळतो. विद्यार्थ्यांमधील मीपणा जागे करण्यासाठी अशा प्रकारच्या व्याख्यानांची गरज असते. म्हणूनच विद्यार्थ्यांनी अशा मार्गदर्शनामधून, स्वतःच्या आयुष्यासाठी अनमोल खजिन्यांची माहिती घेऊन मार्गक्रमण करावे. यावेळी प्रा. डॉ. आर. बी. पाटील यांनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली. त्याशिवाय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना भूगोल विषयाचे महत्त्व, या विषयाची असणारी व्याप्ती आणि भूगोल विषयांमधील विविध संधींची माहिती विद्यार्थ्यांना करून दिली.
शेवटी प्रा. ज्ञानदेव फड यांनी आभार प्रदर्शन केले. या व्याख्यानासाठी बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.

