कवी अजय कांडर यांच्या कवितेचे अभ्यासपूर्ण चिंतन “चर्चा आणि चिकित्सा” ग्रंथात

कवी अजय कांडर यांच्या कवितेचे अभ्यासपूर्ण चिंतन “चर्चा आणि चिकित्सा” ग्रंथात

*कोकण Express*

*कवी अजय कांडर यांच्या कवितेचे अभ्यासपूर्ण चिंतन “चर्चा आणि चिकित्सा” ग्रंथात*

*समीक्षक प्रा.डॉ.रणधीर शिंदे यांचे प्रतिपादन*

*प्रा. नमिता पाटील लिखित “कवी अजय कांडर यांची कविता: चर्चा आणि चिकित्सा” समिक्षा ग्रंथाचे प्रा.शिंदे, प्रा.मोरे, हुजरे, नाईकवाडे यांच्या उपस्थितीत प्रकाशन*

*कणकवली/प्रतिनिधी*

कवी अजय कांडर हे आजच्या मराठी कवितेतील महत्वाचे कवी असून त्यांनी आपल्या कवितेतून खेड्यातील कष्टकरी स्त्रीच्या मुकेपणाचेच गीत गायले. तर दुसऱ्या बाजूला आजच्या सांस्कृतिक – सामाजिक – राजकीय अधोगतीचे चित्र मांडताना अस्थिर जगणेच शब्दबद्ध केले. त्यांचा आवानओल, हत्ती इलो, युगानुयुगे तूच” या पर्यंतचा काव्य प्रवास प्रयोगशील असून या सगळ्याचे अभ्यासपूर्ण चिंतन प्रा. नमिता पाटील लिखित “कवी अजय कांडर यांची कविता: चर्चा आणि चिकित्सा” या ग्रंथात दिसते. असे प्रतिपादन नामवंत समीक्षक प्रा.डॉ. रणधीर शिंदे यांनी केले.
प्रा. नमिता पाटील यांनी लिहिलेल्या “कवी अजय कांडर यांची कविता: चर्चा आणि चिकित्सा” या औरंगाबाद येथील कैलाश पब्लिकेशनतर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या समीक्षा ग्रंथाचे प्रकाशन भोगावती महाविद्यालयाच्या सभागृहात प्रा. शिंदे तसेच शिवाजी विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख समीक्षक नंदकुमार मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंचावर कवी अजय कांडर, प्रा नमिता पाटील,भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष जयसिंगराव हूजरे, शिवराज नायकवाडे, प्राचार्य डी.ए चौगुले, उपप्राचार्य एम.एन पाटील, मराठी विभाग प्रमुख प्रा.सविता व्हटकर आदी उपस्थित होते.
प्रा.डॉ.मोरे म्हणाले खेड्यातील कष्टकरी स्त्रियांच्या वेदने बरोबरच आजच बदलत वास्तव कवी अजय कांडर यांनी आपल्या कवितेत मांडले आहे. त्यांची “बाया पाण्याशीच बोलतात” ही एक बहुचर्चित कविता. स्त्रीचे दुःख एकादी कवयित्री ताकदीने मांडू शकते त्याच विलक्षणपणे कवी कांडर यांनी स्त्रियांचे कष्टकरी जगणे आपल्या कवितेतून मांडले आहे. हत्ती इलो सारखी दीर्घ कविता लिहून प्रदूषित झालेल्या राजकारणावर भाष्य केल आहे. “युगानुयुगे तूच” सारखी दीर्घ कविता लिहून बाबासाहेब आंबेडकर यांच्या कृतिशील विचारांचे दर्शन घडविले आहे. या तिन्ही काव्यसंग्रहाची चिकित्सात्मक समिक्षा प्रा. नमिता पाटील यांनी सदर ग्रंथात केली असून अनेक प्राध्यापकांना मराठी साहित्याची नीट परंपरा माहीत नसताना प्रा. पाटील यांचे हे काम कौतुक करावे असेच आहे.
कवी कांडर म्हणाले, नमिता पाटील यांनी माझ्या कवितेवर लिहिलेल्या समीक्षा ग्रंथामध्ये माझ्या तीस वर्षाच्या काव्य लेखनाची अगदी नेमकी निरीक्षणे नोंदविली आहेत. या त्यांच्या कामाची दखल साहित्य क्षेत्रात नक्कीच घेतली जाईल. या त्यांच्या चिंतनात्मक लेखनामुळे मीच माझ्या कवितेकडे नव्या दृष्टीने बघायला लागलो. यामुळे हा महत्त्वाचा ग्रंथ किती परिश्रमपूर्वक आणि अभ्यासपूर्ण प्रा नमिता पाटील यांनी लिहिला असेल याची कल्पना आपल्याला येते. त्यांनी अशीच समीक्षेच्या क्षेत्रात आपली वाटचाल चालू ठेवावी. त्यांना भविष्यात माझे सर्व प्रकारचे सहकार्य मिळेल. एखाद्या महाविद्यालयाने आपल्याच महाविद्यालयाच्या प्राध्यापकाच्या पुस्तकाचा एवढा भव्य प्रकाशन सोहळा आयोजित करावा याचे कौतुक तर वाटते परंतु असं सहकार्य करणाऱ्या भोगावती कॉलेजच्या प्राचार्यांना मी मनापासून धन्यवाद देतो.
प्रा नमिता पाटील यांनी कवी अजय कांडर यांचे काव्य लेखन समीक्षेच्या दृष्टीने आव्हानात्मक असून मार्गदर्शक प्रा.डॉ.उदय जाधव यांच्या मार्गदर्शनामुळे हा मी ग्रंथ पूर्ण करू शकले असे सांगितले.
प्रास्ताविक प्राचार्य चौगुले यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.पवन पाटील आणि प्रा. विश्वास पाटील यांनी केले. पाहुण्यांची ओळख प्रा.सविता व्हटकर यांनी करून दिली. आभार वैशाली गुंजेकर यांनी मानले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!