*कोकण Express*
*भात खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांनी नोंदणी करा!*
*जिल्हा मार्केटिंग अधिकारी,ए. एस. देसाई यांचे आवाहन*
*कणकवली ः प्रतिनिधी*
धान विक्री शेतकऱ्यांनी हमीभावाने शासकीय धान खरेदी केंद्रावर विक्री करावयाची आहे. ज्या शेतकऱ्यांना धान विक्री करणार आहे, त्यांनी खरेदी केंद्रावर आगाऊ ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करण्यात यावी, अशी माहिती महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनचे जिल्हा मार्केटिंग अधिकारी, ए. एस. देसाई यांनी दिली.
जिल्ह्यात ४१ ठिकाणी धान (भात) विक्री नोंदणी केंद्रे सुरु करण्यात आली असून, यापूर्वी नोंदणीसाठी शुक्रवार दि. १० नोव्हेंबर २०२२ पर्यंत मुदत देण्यात आली होती. तथापि ऑनलाईन पोर्टलवरील माहिती नुसार व मागील हंगामाचा विचार करता शेतकरी नोंदणी पुरेशी झाली नसल्याने शासनाने हंगाम २०२२-२३ करिता किमान आधारभूत किंमत खरेदी अंतर्गत धान खरेदीकरिता ऑनलाईन पध्दतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४१ धान खरेदी केंद्रावरती व महा नोंदणी ॲप वरती शेतकरी नोंदणी करता दिनांक ३० नोव्हेंबर २०२२ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. यापुढे मुदतवाढ मिळणार नाही. तरी ज्या शेतकऱ्यांनी अद्याप नोंदणी केलेली नाही त्या शेतकऱ्यांनी नजिकच्या खरेदी केंद्रावर जाऊन त्वरीत शेतकरी नोंदणी करुन शासकीय धान खरेदी योजनेचा लाभ घ्यावा अशी माहिती जिल्हा मार्केटिंग अधिकारी अनिल देसाई यांनी केली आहे.
यासाठी पुढीलप्रमाणे तालुकावार नोंदणी केंद्रे सुरु करण्यात आली आहेत. सावंतवाडी तालुका- खरेदी विक्री संघ लि. मार्फत सावंतवाडी,मळगाव,मळेवाड, मडुरा, डेगवे, कोलगाव, इंन्सुली, तळवडे, भेडशी. कुडाळ तालुका- खरेदी विक्री संघ लि. मार्फत कुडाळ, कसाल, माणगाव, घोडगे, निवजे, आंब्रड, पिंगुळी, पणदूर, कडावल, तुळस, वेताळबांबार्डे, गोटोस, निरुखे,ओरास. कणकवली तालुका- शेतकरी तालुका खरेदी विक्री संघ लि. कणकवली मार्फत कणकवली, लोरे नं.१, फोंडा, घोणसरी, सांगवे. वेंगुर्ला तालुका- खरेदी विक्री संघ लि. मार्फत वेंगुर्ला व होडावडा. देवगड तालुका- खरेदी विक्री संघ लि. मार्फत देवगड, पडेल, पाटगाव. मालवण तालुका- खेरदी विक्री संघ लि. मार्फत कट्टा, पेंडूर, गोठणे, विरण, मालवण, मसुरे. वैभववाडी तालुका- खरेदी विक्र संघ लि. मार्फत वैभववाडी, करुळ अशा एकूण ४१ केंद्रावर नोंदणी सुरु करण्यात आलेली आहे.