*कोकण Express*
*आता लिहिणाऱ्यानेही रस्त्यावरच्या संघर्षात सहभागी होण्याची गरज ; कॉ. संपत देसाई*
*सावंतवाडीत समाज साहित्य संमेलनाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद*
*”सारेच पुरुष नसतात बदनाम” काव्यसंग्रहाचेही प्रकाशन*
*कणकवली/ प्रतिनिधी*
सध्या साहित्याची परिभाषा बदलत आहे. असे असतानाही शेकडो वर्षांपूर्वी संत जनाबाई, संत तुकोबाराय, महात्मा बसवेश्वर अशा अनेक महनीय व्यक्तींनी आपल्या लेखन साहित्यातून मानवतावाद सांगितला. साहित्यातून मानवतावाद मांडताना दुसऱ्या बाजूला साहित्य लेखनातून शोषितांना न्याय देणेही गरजेचे आहे.तसेच आता लिहिणाऱ्यानेही शोषिताना न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्यावरच्या संघर्षातही सहभागी होणे गरज असल्याचे स्पष्ट प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते तथा लेखक कॉ.संपत देसाई यांनी सावंतवाडी श्रीराम वाचन मंदिर येथे आयोजित केलेल्या ‘समाज साहित्य संमेलना’च्या अध्यक्षपदावरून बोलताना केले.
रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेल्या आणि सुप्रसिद्ध कवयित्री तथा महाराष्ट्र स्टेट टॅक्सच्या डेप्युटी कमिशनर अंजली ढमाळ (पुणे) यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या संमेलनाला प्रतिष्ठानचे संस्थापक कवी अजय कांडर, अध्यक्ष मधुकर मातोंडकर, कार्यवाह प्रा.वैभव साटम, संमेलनातील कवी संमेलनाच्या अध्यक्षा कवयित्री मनीषा पाटील, संस्थेचे इतर पदाधिकारी प्रमिता तांबे, ऍड.मेघना सावंत, प्रियदर्शनी पारकर, संतोष जोईल, तुषार हजारे आदी उपस्थित होते.
कॉ. देसाई पुढे म्हणाले की, आमच्या पूर्वजांनी ज्या पद्धतीने साहित्याची कास धरून ग्रंथ निर्मिती केली, त्यात बहुजनवाद दिसतो. सामान्य माणसाचे जीवन चरित्र रेखाटताना घामाचा दाम, कष्टकऱ्यांचे श्रम आणि मातीची किंमत अशा अत्यंत महत्त्वाच्या विषयांवर लिहिलेले साहित्य जगण्याचे खरे तत्त्वज्ञान सांगत होते. मात्र अलीकडे साहित्यिकाची परिभाषा बदलत चालली आहे. सोशल मीडियाच्या अवास्तव वापरामुळे अनेक जण कॉपी-पेस्टच्या जमान्यात स्वतःला साहित्यिक समजू लागला आहे, हीच मोठी शोकांतिका आहे.
कवयित्री ढमाळ म्हणाल्या जे साधे व सहज असते ते मनाला भावते पण साधे लिहिणेच कठीण असते.मात्र अलीकडे चंगळवाद वाढला असल्यामुळे बऱ्याचदा लिहावे तर नेमके काय लिहावे? असा प्रश्न माझ्यासारख्या कवयित्रीला पडतो.कवींची मानसिकता वेगवेगळ्या विचारात विभागली गेली आहे. हे उत्तम साहित्य निर्मितीसाठी धोकादायक आहे. अशावेळी आपली स्वत:चा लिहिण्याचा स्वतंत्र विचारच आपल्याला पुढे घेऊन जात असतो.
कवी कांडर यांनी आजच्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक चळवळीचा खरा आरसा उपस्थितांसमोर आणला. तसेच समाज आणि साहित्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू असून सामाजिक जीवन जगताना साहित्यिकाने समाजाचा एक भाग होऊन जगणे गरजेचे आहे असे सांगत त्यांनी आजच्या अनेक ज्वलंत विषयांवर भाष्य केले.
संमेलनासाठी संत साहित्याचे अभ्यासक ऍड. देवदत्त परुळेकर, ऍड. संदीप निंबाळकर, कादंबरीकार प्रा. प्रवीण बांदेकर,प्राचार्य डॉ. गोविंद काजरेकर, अंकुश कदम, प्रा. डॉ. गणेश मर्गज,प्रा. संजीवनी पाटील, प्रा. सुभाष गोवेकर, अभिनेते नंदकुमार पाटील, मंगल परुळेकर, प्रज्ञा मातोंडकर,डॉ. सोनल लेले, प्रा. डॉ. सोमनाथ कदम, प्रा. सुचिता गायकवाड-कदम, प्रा. श्वेतल परब, प्रा. प्रतिभा चव्हाण, प्रज्ञा मातोंडकर, महेश पेडणेकर, राजेंद्र कांबळे, विजय ठाकर, परमेश्वर सावळे, ऋतुजा सावंत – भोसले, कवी विठ्ठल कदम यासह अनेक साहित्यिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक वैभव साटम यांनी केले.सूत्रसंचालन प्रा.संतोष जोईल यांनी केले तर आभार मधुकर मातोंडकर यांनी मानले. केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा. वैभव साटम, प्रा. प्रियदर्शनी पारकर – म्हाडगूत, प्रज्ञा मातोंडकर यांच्यासह समाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्गच्या सहकाऱ्यांनी प्रयत्न केले.
*’सारेच पुरुष नसतात बदनाम’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन*
समाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्गचा उपक्रम म्हणून प्रभा प्रकाशनातर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या ‘सारेच पुरुष नसतात बदनाम’ या काव्यसंग्रहाचेही प्रकाशन यावेळी झाले. या संग्रहात मनीषा पाटील, सरिता पवार, प्रा. नीलम यादव-कांबळे , प्रा. प्रियदर्शनी पारकर, मेघना सावंत, योगिता राजकर, शालिनी मोहळे, प्रमिता तांबे, प्रा. सुचिता गायकवाड, रुपाली दळवी नाईक, स्नेहा राणे, आर्या बागवे, मनीषा शिरटावले, रीना पाटील, प्राजक्ता शिंदे, कल्पना बांदेकर, स्नेहा कदम, मृणाल पिळणकर आणि अंजली ढमाळ आदींच्या प्रत्येकी चार कवितांचा समावेश करण्यात आला आहे.

