*कोकण Express*
*”कवी अजय कांडर यांची कविता: चर्चा आणि चिकित्सा” ग्रंथाचा ११ रोजी भोगावती येथे प्रकाशन सोहळा*
*समीक्षक प्रा.डॉ.रणधीर शिंदे, प्रा. डॉ.नंदकुमार मोरे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम*
*भोगावतीच्या प्रा.नमिता पाटील यांचे ग्रंथ लेखन*
*कणकवली/प्रतिनिधी*
कवी अजय कांडर यांच्या गेल्या पस्तीस वर्षाच्या काव्य वाटचालीचा आढावा घेणारा भोगावती येथील प्रा. नमिता पाटील लिखित आणि औरंगाबाद कैलाश पब्लिकेशनतर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या “कवी अजय कांडर यांची कविता: चर्चा आणि चिकित्सा” या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा 11 नोव्हेंबर रोजी सकाळी ९.३० वा. भोगावती महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.
नामवंत समीक्षक प्रा. डॉ. रणधीर शिंदे आणि शिवाजी विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.नंदकुमार मोरे यांच्या प्रमुख उपस्थित होणाऱ्या या कार्यक्रमाला भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष जयसिंगराव हुजरे, शहाजीराजे महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख प्रा डॉ.उदय जाधव, शिवम संस्थेचे अध्यक्ष डॉ.प्रकाश दुकळे,शिवाजीराव नायकवाडे आदींना निमंत्रित करण्यात आले आहे. कवी अजय कांडर हे मराठीतील आजचे महत्त्वाचे कवी आहेत. त्यांचे “आवानओल, हत्ती इलो, युगानुयुगे तूच, अजूनही जिवंत आहे गांधी” आधी काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले असून त्यांच्या काव्य लेखनावरएम.फिल,पी.एच.डीचेही संशोधन झालेले आहे. या पार्श्वभूमीवर “आवानओल, हत्ती इलो, युगानुयुगे तूच” या काव्य लेखनाचा समग्र आढावा घेणारा “कवी अजय कांडर यांची कविता: चर्चा आणि चिकित्सा” हा अभ्यासपूर्ण ग्रंथ प्रा.नमिता पाटील यांनी लिहिला असून तो कैलाश पब्लिकेशन औरंगाबादतर्फे प्रकाशित करण्यात आला आहे. या ग्रंथाबद्दल प्रा नमिता पाटील म्हणतात, कवी अजय कांडर हे सर्वदूर पसरलेल्या खेड्या-पाड्यातील शोषित, कष्टकरी स्त्रियांसह समग्र स्त्रीचे एकटेपण आपल्या कवितेतून मुखर करतात आणि व्यक्त-अव्यक्त स्त्रीचे माणूसपण मानवी संवेदनशीलतेला भिडू पाहतात. तळातील कष्टकरी वर्ग, त्याच्या जगण्याच्या संघर्षातील चढ-उतार हा कांडर यांच्या कवितेचा गाभा आहे. निसर्गासह भवतालच्या परिसराचा वेध घेताना त्यांची कविता झाडालाच माणूसपण प्राप्त करू देऊ पाहते आणि संपूर्ण मानव जातीच्या दुःखाच्या अंत:स्तरांपर्यंत जाऊन स्थिरावते. माणसा-माणसाच्या नातेसंबंधात दडलेली मायेची ओल हे या कवितेचं मूल्यस्थान आहे. स्त्री-वेदनेची अनेक स्पंदने या कवितेत आहेत. खेड्या-पाड्यातील झपाट्याने बदलू लागलेली मूल्यव्यवस्था, सर्वसामान्य माणसाला आत्मसन्मान व अस्तित्व टिकविण्यासाठी करावा लागणारा पराकोटीचा संघर्ष याच्या केंद्रस्थानी कांडर यांची कविता उभी असल्याने ती खऱ्या अर्थाने सामान्यातल्या सामान्य माणसाचा आवाज होऊ पाहते. तर दुसरीकडे हत्तीचे रूपक घेऊन त्यांची कविता आजच्या सामाजिक राजकीय सांस्कृतिक अध:पतनाचा शोध घेते आणि ‘युगानुयुगे तूच’ म्हणत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मानवकेंद्री विचार सर्व जाती धर्माच्या कल्याणाचा कसा आहे, याचेही गीत अंतःकरणापासून तर गाऊ पाहते!म्हणूनच “कवी अजय कांडर यांची कविता:चर्चा आणि चिकित्सा” या ग्रंथाचे लेखन करावेसे वाटले.