*कोकण Express*
*दगडी कोळश्याची वाहतूक करणारे दोन ट्रक जप्त*
*वैभववाडी ः प्रतिनिधी*
चोरीचा दगडी कोळसा घेऊन जाणारे दोन ट्रक वैभववाडी पोलिसांनी पकडले. करूळ चेक पोस्ट याठिकाणी ही कारवाई केली आहे. 8 लाख 58 हजार चा कोळसा पोलिसांनी जप्त केला आहे. एकूण ट्रकसह 18 लाख 58 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान या प्रकरणी पोलीसांनी सोमवारी रात्री उशिरा ट्रान्सपोर्ट कंपनी आणि दोन ट्रकचालकांवर गुन्हा दाखल केला आहे.रविवारी रात्री करूळ तपासणी नाक्यावर रात्री ये-जा करणाऱ्या वाहनांची पोलीसांकडुन तपासणी सुरू होती. रात्री दोन वाजण्याच्या सुमारास वैभववाडीच्या दिशेने (केए-25 डी-9915 आणि केए-22 सी- 9402) कोल्हापुरच्या दिशेने जात असलेले दोन ट्रक करूळ तपासणी नाक्यावर आले. नाक्यावर असलेले पोलीस हवालदार नितीन खाडे आणि पोलीस हवालदार राहुल पवार या पोलीसांनी तपासणीसाठी हे दोनही ट्रक थांबविले.चालकाकडे विचारणा केली असता दगडी कोळसा असल्याचे सांगत कोल्हापुरला घेवुन जात असल्याचे त्यांनी सांगीतले. यावेळी पोलीसांनी चालकांकडील कागदपत्राची तपासणी केली असता दोनही ट्रक चालकांकडे वाहतुक परवाना मिळुन आला नाही.
त्यामुळे पोलीसांचा संशय वाढला त्यांनी यासंदर्भातील माहीती वैभववाडी पोलीस स्थानकात दिल्यानंतर दोनही ट्रक पोलीसांनी ताब्यात घेवुन ते वैभववाडीत आणले. पोलीसांनी ताब्यात घेतलेल्या दोन ट्रकमध्ये सुमारे 22 टन दगडी कोळसा असल्याचे समोर आले. यासंदर्भात पोलीसांनी आज सकाळपासुन चौकशी सुरू केली. त्यानंतर दुपारी दोडामार्ग येथील वेदांत कंपनीचे अधिकारी वैभववाडीत पोहोचले. त्यानंतर या प्रकरणाचा उलगडा झाला. तद्नंतर पोलीसांनी कंपनीच्या तक्रारीनुसार मालवाहतुक करणारी ट्रान्सपोर्ट कंपनी साई बालाजी आणि दोनही ट्रकचालकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.पोलीसांनी पकडलेल्या दगडी कोळश्यांची किमंत सुमारे 8 लाख 58 हजार इतकी आहे.ट्रकसह 18 लाख 58 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सुरज पाटील करीत आहेत.