*कोकण Express*
*त्यावेळी प्रथमेश सावंत, मंगेश सावंत यांची नीतिमत्ता भांडी घासायला गेली का?*
*खोटी कामे करणे ही भिरवंडे ची संस्कृती नाही*
*हिंमत असेल तर आव्हान स्वीकारा*
भिरवंडे सरपंच सुजाता सावंत यांच्यावर राजकीय आकसाने कारवाई केली असे ठाकरे गटाचे प्रथमेश सावंत व मंगेश सावंत हे या म्हणण्यावर ठाम असतील तर कोकण आयुक्तांनी केलेल्या कारवाईच्या पूर्वी झालेली सुनावणी व निघालेले कारवाईचे आदेश हे ठाकरे सरकारच्या कालावधीत काढले गेले होते. त्यामुळे ठाकरे गटाच्या अंतर्गत गटबाजीतूनच हे कारवाईचे आदेश निघाले हे त्यांचे म्हणणे आहे असा टोला भाजप चे बूथ अध्यक्ष श्रीकांत सावंत, सोसायटी माजी चेअरमन संतोष सावंत यांनी लगावला.
या बाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात श्री. सावंत द्वयिनी यांनी म्हटले आहे, कोणताही अपहार, गैरव्यवहार हा कायद्याच्या चौकटीत गुन्हाच असतो. त्यामुळे आपल्या भिरवंडे मर्यादित नेत्यासारखा स्वच्छ समजणाऱ्या प्रथमेश सावंत व मंगेश सावंत यांनी आधी स्वतः केलेले प्रताप तपासावेत. जर भिरवंडे गावामध्ये आतापर्यंत झालेले सर्व सरपंच अशा प्रकारे चुकीची कामे करणारे असल्याचे प्रथमेश सावंत व मंगेश सावंत यांचे म्हणणे असेल तर त्यांच्यावर देखील कारवाई झालीच पाहिजे. नियमासमोर कोणीही मोठा नाही. भिरवंडे मर्यादित नेता असलेल्या सतीश सावंत यांना अगोदर महिलांशी कसे वागावे या नीतिमत्तेचे धडे प्रथमेश व मंगेश सावंत यांनी दिले पाहिजे होते. कारण जिल्हा बँकेच्या निवडणुकी वेळी तहसीलदार कार्यालयात जो प्रसंग घडला त्याचे सर्वजण साक्षीदार आहेत. महिलेबद्दल कारवाई चुकीची असे सांगत जर प्रथमेश सावंत व मंगेश सावंत यांचा कंठ दाटून आला असेल तर जिल्हा बँक निवडणुकीच्या वेळी ही नीतिमत्ता त्यांच्या भिरवंडे मर्यादित नेत्याला त्यांनी का शिकवली नाही? त्यावेळी त्यांची नीतिमत्ता गाठोड्यात गुंडाळून ठेवली होती काय? भिरवंडे ग्रामपंचायत मध्ये हा केवळ एकच प्रकार जनतेसमोर आला आहे. अजूनही यासारखे अनेक गैरव्यवहार, अनियमितता व भ्रष्टाचाराची प्रकरणे आहेत व ती लवकरच जनतेसमोर येतील. व येत्या काही दिवसात हा सगळा भ्रष्टाचार गैरव्यवहार आम्ही उघड करणारच. जर तुम्ही चुकीची कामे केली नसतील तर तुम्हाला घाबरण्याची गरज काय?जर ग्रामपंचायतीमधील काहीच गैर झाले नसतील तर आमचे आव्हान येत्या चार दिवसात स्वीकारा आम्ही वाट पाहत आहोत. भिरवंडे सरपंच सुजाता सावंत यांच्यावर झालेली कारवाई ही दबावाखाली नाही तर कायद्यानुसार झाली आहे. दबावाखाली कारवाई असे म्हणणे असेल तर ठाकरे सरकार कायदा सोडून दबावाखाली कारवाई करत होते असे प्रथमेश सावंत यांचे म्हणणे आहे का?रस्ता व्हावा म्हणून 23 नंबर दिला होता हे सांगत असताना सरपंच हा नियम व कायद्यानुसार बसलेला असतो. त्यामुळे सरपंचाने गावच्या विकासासाठी काम करत असताना कायदा सोडून काम करणे हे जनतेला व कायद्याला देखील अपेक्षित नाही. सरपंचांना प्रशासकीय अनुभव कमी होता असे सांगत असणाऱ्या प्रथमेश व मंगेश सावंत यांना स्वतःला यापूर्वी काही अनुभव आहे का? हे अगोदर तपासावे. कारण मंगेश सावंत यांनी पंचायत समिती मध्ये गेल्या पाच वर्षात आडवी काठी उभे करण्याचे देखील काम केले नाही. तसेच प्रश्न जमीन मालकांनी तक्रार देण्याचा नसतो. काम नियमात होत नसेल तर तक्रार करणे हे विरोधी पक्षाच्या व्यक्तीचे काम आहे. अन्यथा तुमच्या मनाला वाटेल तशी कामे करून घेणे यातून अंदाधुंदी माजेल. ग्रामपंचायत ही कुणाची मालकी नाही हे अगोदर प्रथमेश व मंगेश सावंत यांनी लक्षात घ्यावे. त्यातच प्रथमेश सावंत यांनी अशा प्रकारे सरपंचांवर कारवाई करायला लावणे अशोभनीय आहे हे सांगत असताना प्रथमेश सावंत यांच्या तोंडी अगोदर अशोभनीय हा शब्द शोभतो का ते त्यांनी तपासून पहावे. नाटळ विभागात पदाचा वापर करून अनेक कामे झाकून टाकली असा आरोप गोट्या सावंत यांच्यावर करत असताना गेल्या अडीच वर्षात ठाकरे गटाचे सरकार होते त्यावेळी प्रथमेश सावंत व मंगेश सावंत हे काय करत होते ? सतीश सावंत यांच्यावर महिलेला अपशब्द वापरल्याचा त्यावेळी दाखल झालेला गुन्हा हा प्रथमेश व मंगेश सावंत विसरले का? गावची बदनामी ही चुकीची कामे करायला भाग पाडून त्यामुळे वास्तविक पाहता भिरवंडे सरपंच सुजाता सावंत यांनी देखील तमाम भिरवंडेवासीयांची माफी मागितली पाहिजे. कारण चुकीची व खोटी कामे करणे ही भिरवंडे ची संस्कृती नाही. प्रथमेश व मंगेश सावंत यांनी पेपर च्या माध्यमातून आवाज उठवण्यापेक्षा हिम्मत असेल तर आम्ही दिलेले आव्हान स्वीकारा. आता कंठ फुटलेल्या मंगेश सावंत यांनी घेतलेल्या साकवाच्या कामाची तक्रार त्यांच्याच पक्षाचे खासदार विनायक राऊत यांच्या लेटर पॅड वर प्रथमेश सावंत यांनी केली होती. म्हणून मंगेश सावंत यांना आताच प्रथमेश सावंत यांच्यासोबत स्टेटमेंट देण्याचा साक्षात्कार कसा काय झाला? तसेच तुमची सत्ता असताना नाटळ विभागातील अनेक विकास कामांच्या तक्रारी करून त्रास देण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यातून तुम्ही काहीच निष्पन्न करू शकलात नाही. त्यामुळे अजूनही जरी जमत असेल तर तक्रारी करून तक्रारी सिद्ध करून दाखवा असे आवाहन यावेळी देण्यात आले.