*कोकण Express*
*पटकीदेवी ते नागवे रस्त्याचे काम पंधरा दिवसात करा ; अन्यथा आंदोलन छेडणार…!*
*सा.बां.विभागाला शहर भाजपाचा इशारा…!*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कणकवली ते नागवे करंजे हा १९ कि.मी. चा रस्ता गेली अनेक वर्षे नादुरूस्त आहे. पटकीदेवी मंदिर ते स्वयंभू मंदिर पर्यंतचा रस्ता अत्यंत खराब झालेला आहे. त्यामुळे सदर रस्त्यावरून चालणे व वाहतूक करणे अतिशय धोक्याचे झाले आहे. गेली दोन – तीन वर्षे सतत आपल्या कार्यालयाकडे तक्रार देऊनही कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. मलमपट्टी करून लोकांच्या डोळ्यात धूळ फेकली जात आहे. त्रिपुरारी पौर्णिमेच्या अगोदर या रस्त्याची तातडीने डागडुजी करावी व येत्या पंधरा दिवसात लगेचच हे काम सुरू करावे अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा कणकवली शहर भाजपच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आला आहे. उपकार्यकारी अभियंता के. के. प्रभू यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात म्हटले आहे, सदर रस्त्याचे नगरपंचायतच्या डीपीवर 12 मीटर रुंदीकरण आहे . तथापि आज रोजी हा रस्ता ९ मीटर संदीकरणाने करण्यात येऊन हा रस्ता किमान १५ वर्षे टिकेल असा करण्यात यावा. त्याचप्रमाणे सदर रस्त्यावर काही लोकांनी अतिक्रमण केलेले आहे ते हटविण्यात यावे. तरी याबाबत येत्या १५ दिवसांत सदर रस्त्याचे डांबरीकरण व मजबुतीकरण / गटार चे काम न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा भाजपाच्या वतीने देण्यात आला आहे. दरम्यान या संदर्भात कणकवली नगराध्यक्ष यांनी देखील नुकतेच आमदार नितेश राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे लक्ष वेधले होते. सुमारे सहा कोटींचा निधी या कामासाठी मंजूर करण्याचे आश्वासन आमदार नितेश राणे यांना पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिले होते. त्यानुसार या कामाच्या पुढील प्रक्रिये बाबत अधिकाऱ्यांनी काय माहिती घेतली असा सवाल देखील यावेळी उपस्थित करण्यात आला. दरम्यान याबाबत उपकार्यकारी अभियंत्याने लवकरात लवकर हे काम मार्गी लावण्याची ग्वाही दिल्याची माहिती भाजपा कडून देण्यात आली. यावेळी भाजपा शहराध्यक्ष अण्णा कोदे, जिल्हा बँक संचालक विठ्ठल देसाई, गटनेते संजय कामतेकर, नगरसेवक शिशीर परुळेकर, माजी उपनगराध्यक्ष किशोर राणे, सुशील पारकर, जावेद शेख, राकेश वालावलंकर आदी उपस्थित होते.