*कोकण Express*
*समर्थन रॅलीच्या माध्यमातून भाजपचे कार्यकर्ते जशास तसे उत्तर देतील ; राजन तेली..*
*आ.भास्कर जाधव यांच्यावर पोलिसांनी कडक कारवाई करावी*
*कणकवली ः प्रतिनिधी*
शिवसेनेच्या वतीने कुडाळ येथे काढलेल्या मोर्चात आ.भास्कर जाधव आणि मंडळींनी कोकणचे नेते, केंद्रीयमंत्री नारायणराव राणे यांच्यावर वैयक्तिक पातळीवर अत्यंत अश्लाघ्य भाषेत टीका केली,मी जिल्हाध्यक्ष या नात्याने भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांचा जाहीर निषेध करतो.आ.भास्कर जाधव यांच्यावर पोलिसांनी कडक कारवाई करावी,अशी मागणी भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केली.तसेच भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते समर्थन रॅलीच्या माध्यमातून त्यांना जशास तसे उत्तर देतील,असा इशारा त्यांनी दिला.
शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्याच्या मुजोरपणाला तोडीस तोड उत्तर देण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते तत्पर आहेत.पण उठसुठ साध्या वक्तव्यावरून तक्रार दाखल करून घेणाऱ्या पोलीस प्रशासनाने त्यांच्यावर तात्काळ कडक कारवाई करावी.ना.नारायण राणे यांनी कोकणचेच नव्हे तर राज्याचे नेतृत्व केलेले आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व सत्तास्थाने गेली अनेक वर्षे एकहाती सांभाळलेली आहेत. भारतीय जनता पार्टीचे नेते म्हणून ते आज केंद्रात नेतृत्व करीत आहेत. आपाल्या लाडक्या नेत्याचा अपमान भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता कधीच सहन करणार नाही.त्यांच्यावर पोलीस कारवाई झाली नाही आणि त्यांच्या पाठीशी असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये जर असंतोष निर्माण झाला तर होणाऱ्या परिस्थितीची संपूर्ण जबाबदारी पोलीस आणि जिल्हा प्रशासनावर राहील याची प्रशासनाने नोंद घ्यावी आणि वेळीच आजच्या बेताल वक्तव्य करणाऱ्या भास्कर जाधव आणि मंडळींवर कडक कारवाई करावी.
२१ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या संविधान समर्थन रॅलीत भारतीय जनता पार्टीचे नेते आणि कार्यकर्ते या त्यांच्या आगाऊपणाचा योग्य तो समाचार घेतील आणि यापुढे या मंडळींना जिल्ह्यात वावरण्याचा फेरविचार करायला लावतील.उद्या राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेऊन यासंदर्भात तक्रार देत योग्य ती कारवाई करण्याची मागणी करणार आहे असे भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी सागितले.