*कोकण Express*
*राजापूर तालुक्यात दिवाळीनंतर 31 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी*
*रत्नागिरी ः प्रतिनिधी*
तालुक्यातील 31 ग्रामपंचायतींच्या मुदती पुढील महिन्यामध्ये संपणार असून त्या ग्रामपंचायतींच्या आगामी निवडणूकींच्या अनुषंगाने प्रशासनाकडून पूर्वतयारी हाती घेण्यात आली आहे. त्यामध्ये निवडणूका होवू घातलेल्या ग्रामपंचायतींच्या प्रशासनाकडून प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या तयार करण्यात आल्या असून त्या गुरूवारी 13 नोव्हेबर रोजी प्रसिद्ध होणार आहेत. त्यावर मंगळवार 18 नोव्हेंबरपर्यंत हरकती दाखल करावयाच्या आहेत.
तालुक्यामध्ये सध्या 10 ग्रामपंचायतींच्या निवडणूका होत आहे. त्या निवडणूकीचा धुरळा खाली बसतो न बसतो तोच पुढील महिन्यामध्ये तालुक्यातील तब्बल 31 ग्रामपंचायतीच्या मुदती संपणार आहेत.
यामध्ये यामध्ये मिठगवाणे, नाणार, परूळे, शिवणे बुद्रुक, तळवडे, नाटे, साखर, वडवली, वाटुळ, डोंगर, कळसवली, साखरीनाटे, झर्ये, उपळे, शेजवली, प्रिंदावण, कोतापूर, देवीहसोळ, जैतापूर, हातिवले, आजिवली, ओझर, कोळवणखडी, जुवाठी, येळवण, पाचल, खरवते, माडबन, विल्ये, हसोळतर्फ सौंदळ, धाऊलवल्ली या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
या ग्रामपंचायतीच्या निवडणूका लवकरच जाहीर होणार आहेत. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूका डोळ्यासमोर ठेवून ग्रामपंचायत निवडणूकीच्या माध्यमातून ग्रामीण राजकारणावर वर्चस्व राखण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये ‘काँटे की टक्कर’ होणार आहे.
दरम्यान, या ग्रामपंचायतीच्या निवडणूकीच्या अनुषंगाने प्रशासनाकडून पूर्वतयारी सुरू केली आहे. त्यामध्ये संबंधित ग्रामपंचायतींच्या मतदारांच्या प्रारूप मतदार याद्या तयार करण्यात आल्या आहेत. या प्रारूप मतदार याद्या येत्या गुरूवारी प्रसिद्ध होणार आहेत. या मतदार याद्यांवर गुरूवार ते मंगळवार या कालावधीमध्ये हरकती आणि सूचना दाखल करावयाच्या आहेत. दाखल झालेल्या हरकतींवर पढील कार्यवाही होवून अंतिम मतदार यादी येत्या शुक्रवारी 21 नोव्हेंबर रोजी प्रशासनाकडून प्रसिद्ध केली जाणार आहे.

