*कोकण Express*
*सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन उपजिल्हा प्रमुखांचा शिंदे गटात प्रवेश*
*दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रवेश*
*वेंगुर्ला ः प्रतिनिधी*
एकीकडे उद्धव गटाच्या शिवसेनेचं चिन्ह आणि नाव हे नुकतंच निवडणूक आयोगाने गोठवलं असल्याने धक्का बसलेल्या उद्धव ठाकरे गटाला एकामागोमाग एक असे धक्के बसत आहेत. बाळासाहेबांचे निष्ठावान शिवसैनिक हे अखेर “बाळासाहेबांची शिवसेना” म्हणजेच शिंदे गटात प्रवेश करत आहेत. आणि याचे पडसाद हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील पडत आहेत. बाळासाहेबांच्या विचारांशी एकनिष्ठ असलेल्या शिवसैनिकांचा मोठ्या प्रमाणात शिंदे गटाला पाठिंबा दिसून येतो. त्यातच आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन उपजिल्हा प्रमुखांचा मुख्यमंत्री निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज सकाळी प्रवेश झाला.
यात शिवसेना उपजिल्हाप्रमुख बाळा दळवी, सचिन देसाई, सुनील दुबळे यांसह होडवडा शाखा प्रमुख कल्पेश मुळीक यांनी शिंदे गटात प्रवेश केला. यावेळी महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, जि.प. सदस्य नितीन शिरोडकर, शिंदे गट वेंगुर्ला तालुका प्रमुख नितीन मांजरेकर, वेंगुर्ला शहर प्रमुख सचिन वालावलकर, सावंतवाडी माजी नगराध्यक्ष राजन पोकळे उपस्थित होते.
त्यामुळे शिंदे गटाची अर्थात “बाळासाहेबांची शिवसेना” या पक्षाचे मजबुतीकरण सिंधुदुर्गात मोठ्या प्रमाणात होत आहे. आणि एकीकडे उद्धव ठाकरे यांची शिवसेना शिंदे गटासमोर कमजोर होताना दिसत आहे. सिंधुदुर्गात होत असणारी ही राजकीय उलथपालथ याचे मोठे परिणाम उद्धव गटाला येत्या निवडणुकीला भोगावे लागणार आहेत. अशी चर्चा राजकीय वर्तुळात चालू आहे.