*कोकण Express*
*उद्धव ठाकरेंच्या हातात ‘मशाल’, तर शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ नाव*
*मुंबई*
शिवसेनेचे निवडणूक चिन्ह निवडणूक आयोगाने गोठवलं आणि शिवसेना हे नाव वापरण्यास मनाई केल्यानंतर उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गटाला कोणतं चिन्ह आणि नाव मिळतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अखेर निवडणूक आयोगाने आज याबद्दलचा निर्णय दिला आहे.
उद्धव ठाकरे गटाला केंद्रीय निवडणूक आयोगाकडून ‘मशाल’ हे चिन्ह देण्यात आलं आहे. तर ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ असे नाव देण्यात आले आहे. यासोबतच एकनाथ शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ असे नाव देण्यात आले आहे. दरम्यान अद्याप शिंदे गटाला कोणतेही चिन्ह मिळालं नाहीये. आयोगाकडून नवीन तीन चिन्हे सूचवा असे शिंदे गटाला सांगण्यात आले आहे.
हेही वाचा: Shivsena: ठाकरेंचा दावा खरा! शिंदे गटाकडून थेट शिवसेनेच्या माजी खासदारावरच गुन्हा
रविवारी सायंकाळी बोलतांना उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेला पर्यायी नावं आणि चिन्हंदेखील त्यांनी दाखवून दिले होते. त्रिशुळ, उगवता सूर्य आणि धगधगती मशाल या चिन्हांचे फोटो उद्धव ठाकरेंनी दाखवले होते. शिवाय नावांमध्ये शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही पर्यायी नावं निवडणूक आयोगाला दिली होती.
तसेच निवडणूक आयोगाला शिंदे गटाने सादर केलेल्या नावांमध्ये शिवसेना बाळासाहेब ठाकरे, बाळासाहेबांची शिवसेना आणि शिवसेना बाळासाहेबांची असे तीन पर्याय देण्यात आले होते यापैकी शिवसेना बाळासाहेब ठाकरे या नावाचा प्रस्ताव ठाकरे गटानेदेखील दिला होता. शिंदे गटाने बंड केल्यानंतर आम्हीच खरी शिवसेना, बाळासाहेबांची शिवसेना असल्याचा दावा करण्यात येत होता. त्याचे प्रतिबिंब शिंदे गटाने दिलेल्या नावाच्या पर्यायात दिसून आले होते. यापैकी बाळासाहेबांची शिवसेना हे नाव शिंदे गटाला मिळालं आहे.
हेही वाचा: Maharashtra Politics: ‘अंधेरी पोटनिवडणूक ‘मविआ’ म्हणून लढवणार’, परब आणखी काय म्हणाले? वाचा
शिंदे गटाला तीन नवीन चिन्ह सादर करावे लागणार आहेत, उद्या सकाळी १० वाजेपर्यंत सादर करायचे आहेत. शिंदे गटाने त्रिशुळ, उगवता सुर्य आणि गदा हे चिन्ह निवडणूक आयोगाला सादर केले होते. दुसरीकडे ठाकरे गटाने त्रिशुळ, उगवता सुर्य आणि मशाल हे चिन्ह सादर केले होते. दरम्यान निवडणूक आयोगाने दोनही गटाची धार्मिक चिन्ह रद्द केली होती.