*कोकण Express*
*सोशल मीडियाचा उपयोग करून यशाची शिखरे प्राप्त करा*
डॉ .विष्णू फुलझेले*
*फोंडाघाट ः प्रतिनिधी*
‘सध्याचे युग हे सोशल मीडियाचे युग आहे. सोशल मीडियामुळे सर्वांचा वेळ वाचतो. संपूर्ण जग या माध्यमातून जवळ आलेले आहे. साहजिकच वेळ वाचल्यामुळे समाज गतिमान झाला आहे. ही गती आपल्याला प्राप्त करायची असेल तर सोशल मीडियाचे ज्ञान अत्यावश्यक आहे.’ असे प्रतिपादन माजी पंचायत समिती सभापती सौ.सुजाता राणे हळदिवे यांनी केले.
फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीच्या कला आणि वाणिज्य महाविद्यालय फोंडाघाट येथे ग्रंथालय विभाग व सावित्रीबाई फुले महिला विकास कक्षाच्या संयुक्त विद्यमाने सोशल मीडिया आणि युवा पिढी या विषयावर मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी प्रमुख वक्त्या म्हणून सौ. सुजाता राणे हळदिवे बोलत होत्या. आपल्या मार्गदर्शनात ते पुढे म्हणाल्या की सोशल मीडिया हा आजच्या तरुण पिढीचा आत्मा असला तरी देखील आपण त्याचा वापर कशाप्रकारे करतो यावर त्याचे भविष्य अवलंबून आहे. सोशल मीडियाचा अतिवापर झाला तर वर्तमानातील जगणे राहून जाईल. सोशल मीडियाकडून नको असलेल्या गोष्टी सुद्धा दिल्या जातात. त्या आपल्याला टाळता आल्या पाहिजेत. आकाशात भरारी घ्यायची असेल तर ग्रंथालये उपयुक्त ठरतात. ग्रंथालयाचा उपयोग करून आपले वैयक्तिक ज्ञान वाढवणे शक्य होते. सोशल मीडियाच्या अति वापरामुळे समाजात नैराश्य पसरते ते दूर करणे युवा पिढीच्या हातात आहे. असे विचार सुजाता राणे हळदिवे यांनी मांडले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विष्णू फुलेझेले यांनी अध्यक्ष भाषणात मार्गदर्शन करताना सांगितले की,’ युवा पिढीने सोशल मीडियाचा वापर केला पाहिजे. इंटरनेटच्या वापरामुळे नवनवीन माहिती प्राप्त होत असते. या नवीन माहितीचा उपयोग आपल्या अभ्यासात केला गेला. तर यशाची शिखरे गाठता येणार आहेत. हेच आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे ध्येय असले पाहिजे.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभाग प्रमुख डॉ. विद्या मोदी यांनी केले तर आभार प्रा. नम्रता मनचेकर यांनी मानले या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.