*कोकण Express*
*नांदगाव येथील साखळी उपोषण तिसऱ्या दिवशी सोडले*
*कणकवली ः प्रतिनिधी*
महामार्ग ठेकेदार व प्रशासनाच्या मनमानी कारभाराबाबत नांदगाव येथील रोहन नलावडे आणि कुटुंबिय यांनी केलेले साखळी उपोषण शुक्रवारी तिसर्या दिवशी मागे घेण्यात आले. उपविभागीय अधिकारी कणकवली यांनी 23 डिसेंबरला सदरच्या जागेची पुन्हा मोजणी करण्यात येईल असे लेखी दिल्याने हे उपोषण सरबत पिउन थांबविण्यात आले. अनधिकृत माती उत्खनन, अनधिकृत वृक्षतोड आणि विद्युत खांबाची धोकादायक रचना याबाबत हे उपोषण करण्यात आले होते. मुंबई गोवा महामार्गालगत नांदगाव तिठ्ठा येथे असलेल्या घरालगतची माती कोणतीही पूर्वसूचना न देता उत्खनन केली. तसेच, झाडे आणि इतर मालमत्तेचे नुकसान केले. शिवाय विद्युत खांबाची धोकादायक रचना केली आहे. याबाबत लेखी तक्रार करुनही प्रशासनकडून कोणतीही दाद न मिळाल्याने गेले तीन दिवस हे उपोषण सुरु होते. बुधवारी सकाळी उपोषण सुरु झाल्यानंतर उपोषणस्थळी खारेपाटण सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता डी. जी. कुमावत यांनी भेट दिली. त्यावेळी नलावडे कुटूंबियांच्या समस्या जाणून घेवून चर्चा केली. परंतू या चर्चेत त्यांचे समाधान न झाल्याने तिसर्या दिवशी संध्याकाळ पर्यंत उपोषण सुरू होते. या उत्खननामुळे नलावडे यांच्या घरापर्यंत जाण्यासाठी रस्ता ही राहीलेला नाही. घरात वयोवृध्द माणसे राहत असून त्यांना नाहक त्रास होत आहे. तसेच ठेकेदार कंपनीने संपादीत जागेच्या बाहेर येत नलावडे यांच्या जागेत उत्खनन करून पूर्णपणे नुकसान केले असल्याचेही तक्रारीत म्हटले होते. उपविभागीय अधिकारी कणकवली यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की’ सदर जागेचे नलावडे यांच्या समक्ष पुनश्च जमीन व बांधकामाची संयुक्त मोजणीपत्रक व नकाशा नुसार प्रत्यक्ष पाहणी 23 डिसेंबर रोजी सकाळी 11.30 वा. करुन उपअभितंता सार्वजनिक बांधकाम कणकवली व उपअधिक्षक भूमि अभिलेख कणकवली यांना अहवाल सादर करण्यात येईल. सदरचे पत्र नांदगाव मन्डळ अधिकारी विद्या जाधव यानी रोहन नलावडे यांना दिले. यावेळी नांदगाव तलाठी सुदर्शन अलकुटे.खारेपाटण उपअभियंता डी. जी. कुमावत, शिवसेना शाखा प्रमुख राजा म्हसकर उपस्थीत होते.