*कोकण Express*
*आपली आवड जोपासत केलेलं कोणतेही कार्य उल्लेखनीय असते….अॅड. संजय खेर*
माणूस म्हटलं की आवड ही असतेच पण यासाठी सवड ही महत्त्वाची असते. आवड असणारी व्यक्ती कोणत्याही क्षेत्रात वेळ देतेच व उल्लेखनीय कार्य सातत्याने करत असते यातूनच एक निर्माता तयार होत असतो. असे निर्माते वराडकर हायस्कूलमध्येही आहेत आणि ते निर्माण करण्याचे कार्य येथील शिक्षक ,शिक्षिका करत आहेत. यासाठी कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्य अद्वितीय मानावे लागेल ,असे उद्गार आधुनिक शैक्षणिक तंत्रज्ञान साहित्य प्रदान करताना वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टा या ठिकाणी केले आधुनिक शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री सुधीर वराडकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात सौ रश्मी पाटील यांनी प्रशालेतील उपक्रमाबद्दल प्रशंसनीय उद्गार काढले. कला क्रीडा व सामाजिक क्षेत्रात प्रशालेने केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल बोलत असताना आज या प्रशालेत शिकणारे विद्यार्थी हे विदेशात शिक्षण घेत आहेत हे खरोखरच आपल्यासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. कार्यक्रम प्रसंगी संजीवनी खेर यांनी लिहिलेल्या पुस्तकांचे संच ग्रंथालयाला भेट दिले. स्वतः संजीवनी खेर यांनी सही करून दिलेल्या पुस्तकांची भेट ग्रंथालयास देणे ही विशेष बाब ठरली. लंडन येथे वकिली करणाऱ्या साईल खेर याने सामाजिक बांधिलकीतून शाळेला एल. ई .डी. टीव्ही चा एक संच भेट दिला. यावेळी संस्थेच्या सचिव श्रीमती विजयश्री देसाई यांनी श्री .संजय खेर (वकील उच्च न्यायालय) सौ.रश्मी पाटील (रोटरी क्लब मुंबई व त्यांच्या बरोबर काम करणाऱ्या व्यक्तींचा दाखला देत डॉ.काकासाहेब वराडकर यांनी दिन, दलित, गरीब, मजूर, गरजू विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासाठी जी शाळा स्थापन केली त्याची सुरुवात अगदी कठीण परिस्थितीतून होऊन सुद्धा आज शाळा शतक महोत्सव वर्षात पदार्पण करत आहे. येणाऱ्या काळात विद्यार्थ्यांची सोय व गरजा पाहून आपल्यासारख्या दात्यांची गरज असून आज सामाजिक बांधिलकीतून दिलेल्या भेटीचा स्वीकार करून असा लोभ कायम राहावा व सहकार्य मिळावे अशी एक हाक दिली. तसेच कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री अजयराज वराडकर,विश्वस्त अॅड .पवार साहेब यांनी दात्यांचे दूरध्वनुद्वारे आभार मानले. या प्रसंगी इयत्ता आठवी अ मधील विद्यार्थिनी कुमारी श्रेया चांदरकर हिने श्री संजय खेर यांना आपण बनवलेल्या पेन्सिल स्केच चित्राची भेट दिली. या कार्यक्रम प्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक संजय नाईक यांनी शाळेच्या गरजा व त्यांची उपयोगिता सांगून मान्यवरांनी कमी वेळात शाळेत येऊन शाळेची गरज पूर्ण केली, या दाखवलेल्या औदार्या बद्दल आनंद व्यक्त केला.
सूत्रसंचालन श्री समीर अशोक चांदरकर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री संजय चंद्रकांत पेंडुरकर यांनी केले. यावेळी व्यासपीठावर पर्यवेक्षिका सौ देवयानी धनंजय गावडे, अॅड. संजय खेर (वकील ,उच्च न्यायालय)सौ रश्मी पाटील रोटरी क्लब मुंबई, साहिल खेर, सचिव विजयश्री देसाई ,स्कूल कमिटी अध्यक्ष सुधीर वराडकर, मुख्याध्यापक श्री संजय सुभाष नाईक ,प्रशालेतील सर्व शिक्षक- शिक्षिका ,विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.