*कोकण Express*
*‘त्या’ कापूर कंपनीच्या मालकाने अखेर समस्त भाविकांची मागितली जाहीर माफी…*
*नितेश राणेंनी दिला होता दणका; माफीनाम्याचा व्हिडिओ समाज माध्यमावर प्रसारित…*
*बांदा ःःप्रतिनिधी*
आमदार नितेश राणेंच्या दणक्यानंतर प्रभू श्रीरामचंद्रांचा जाहिरातीत अवमान करणाऱ्या ‘त्या’ कापूर कंपनीच्या मालकाने अखेर समस्त भाविकांची जाहीर माफी मागितली आहे. तसा माफीनाम्याचा व्हिडिओ समाज माध्यमावर प्रसारित केला आहे. बांद्यातील व्यापारी व नागरिकांनी संबंधित कंपनीची तक्रार आमदार नितेश राणे यांच्याकडे केली होती. तसेच संबंधित कंपनीचा कापूर विक्री व वापर बंद केला होता.
नितेश राणे यांनी बांदावासियांच्या या त्याग आंदोलनाची दखल घेत कंपनीला माफी मागण्यास भाग पाडण्याचे अभिवचन ८ दिवसांपूर्वी बांदा येथे दिले होते. कापूर बनविणाऱ्या मंगलम ऑर्गेनिक्स या कंपनीने दीड वर्षांपूर्वी कापूरची जाहिरात टेलिव्हिजनवर प्रकाशित केली होती. त्यात प्रभू श्रीरामचंद्रांचा अवमान करण्यात आला होता. त्यावरुन भक्तगणांमध्ये नाराजी पसरली होती. बांदा शहरातील सर्व देवस्थाने, व्यापारी व नागरिकांनी सदर कापूर त्याग आंदोलन सुरु केले होते. या आंदोलनाचे नेतृत्व व्यापारी तथा पत्रकार आशुतोष भांगले यांनी केले होते. बांदा सरपंच अक्रम खान यांनी या आंदोलनाची माहिती नितेश राणे यांना दिल्यानंतर ते खूप प्रभावित झाले होते. बांदा येथे समस्त आंदोलकांची भेट घेत त्यांचे कौतुकही केले होते. सदर कंपनीच्या मालकाला माफी मागण्यास भाग पाडू, लवकरच तसे चित्र दिसेल असा ठोस शब्दही आमदार राणेंनी दिला होता.
मंगलम ऑर्गेनिक्सचे मालक पंकज दुधोजवाला यांनी तसा माफीचा व्हिडिओ प्रसारित केला आहे. त्यात त्यांनी समस्त भाविकांची जाहीर माफी मागितली आहे. भक्तांच्या भावना दुखावण्याचा आमच्या कंपनीचा हेतू नव्हता. सदर जाहिरात हटविण्यात आली असून समस्त भक्तगणांची माफी मागत असल्याचे म्हटले आहे. याबाबत बांद्यातील व्यापारी, आंदोलक व नागरिकांनी आमदार राणे यांचे आभार मानले आहेत.