*कोकण Express*
*आ.वैभव नाईक यांची ACB कडून कणकवलीत तासभर केली चौकशी*
*कणकवली ः प्रतिनिधी*
लाचलूचपत प्रतिबंधक रत्नागिरी विभागाचे पोलीस उपअधीक्षक सुशांत चव्हाण हे पथकासह शुक्रवारी सायंकाळी उशिरा कणकवलीत दाखल झाले. या पथकातील अधिकाऱ्यांनी आमदार नाईक यांच्याशी संपर्क साधल्यानंतर येथील शासकीय विश्रामगृहावर श्री. नाईक दाखल झाले. या ठिकाणी श्री. नाईक यांची सुमारे एक तास चौकशी करण्यात आल्याचे समजते. दरम्यान श्री. नाईक यांच्याशी संपर्क साधला असता प्रतिबंधक विभाग रत्नागिरी यांच्या अधिकाऱ्यांनी आपणाला सायंकाळी उशिरा फोन केला. त्यावेळी आपण कणकवलीतच होतो. त्यांनी मागितलेल्या माहितीनुसार आपण शासकीय विश्रामगृहावर दाखल होत त्यांना आवश्यक माहिती दिलेली आहे. तसेच त्यांनी मागितलेली इतर माहिती व विवरण पत्रे त्यांना सादर करण्यात येतील. हा प्रकार म्हणजे दबाव तंत्राचा प्रकार आहे. गृहखात्याच्या दबावाखाली हा प्रकार सुरू असून असे कितीही प्रकार केले तरी आम्ही त्याला भीक घालत नाही, असे श्री. नाईक यांनी स्पष्ट केले.
दरम्यान सत्ता बदल होताच शिवसेनेच्या अनेक नेत्यांची इडी, सीबीआय मार्फत चौकशी करून कारवाई केली जात असतानाच आता आमदार नाईक यांची एसीबी मार्फत चौकशी सुरू करण्यात आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
या अनुषंगाने श्री. नाईक यांचा जबाब नोंदविण्यासाठी 12 ऑक्टोबर, 2022 रोजी सकाळी 11 वाजता पोलीस उपअधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रत्नागिरी येथे उपस्थित राहण्यासंदर्भातही श्री. नाईक यांना पत्र देण्यात आले आहे.