*कोकण Express*
*भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमुळे डागाळलेली जिल्हा परिषदेची प्रतिमा“ स्वच्छ” कधी होणार ?*
*खरं तर भ्रष्टाचारी प्रवृत्तींवर कठोर कारवाई करून जिल्हा परिषदेची खऱ्या अर्थाने “ साफ सफाई” होणे आवश्यक..*
*स्वच्छतेच्या बाबतीत नेहमीच सिंधुदुर्ग जिल्हा अग्रेसर.. त्यामुळे पुरस्काराचे खरे मानकरी हे जिल्हावासीयच !*
स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा २ अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षणात सिंधुदुर्ग जिल्ह्याने पच्छिम भारतात दुसरा क्रमांक पटकविणे ही अभिमानास्पद बाब असून याचे संपूर्ण श्रेय हे स्वच्छतेच्या बाबतीत नेहमीच अग्रेसर असणाऱ्या जिल्हा वासियांचेच आहे. मागील दोन तीन वर्षात लाड पागे-अनुकंपा भरती प्रकरण, वॉटर प्युरीफायर-संगणक-टेलिव्हिजन-शेगडी खरेदी घोटाळे, देवगड शिक्षण विभाग अपहार अशी उघड झालेली प्रकरणे पाहता सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या कारभाराची मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी खरी “साफ सफाई” करणेची आवश्यकता असून भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमुळे डागाळलेली जिल्हा परिषदेची प्रतिमा खऱ्या अर्थाने “ स्वच्छतेची ” गरज आहे. पशु पक्षी कृषी महोत्सव, स्वछता पुरस्कार मिरवणूक रॅली असे इव्हेंट जिल्हावासीयांसमोर करून भ्रष्ट कारभाराच्या प्रकरणांवर पांघरून घालण्याचा प्रयत्न अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून होत आहे. मनसेसह जिल्ह्यातील विविध राजकीय पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्त्यांकडून जिल्हा परिषदेतील भ्रष्टाचाराची गंभीर प्रकरणे उघड होवून देखील एकाही प्रकरणात ठोस कारवाई व जनतेच्या पैशांची वसुली झालेली नाही; याउलट दोषींना पाठीशीच घालण्याचे काम जबाबदार अधिकाऱ्यांकडून होत आहे हे दुर्दैव आहे. एवढ सगळं होवून देखील चक्क मुख्य कार्यकारी अधिकारी दालनाच्या देखभाल व सुशोभिकरण कामातच भ्रष्टाचार होतो ह्याचा अर्थ जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कुणाचाही धाक उरलेला नाही असाच होतो. आतापर्यंत मोठ मोठे आर्थिक घोटाळे उघड होवून देखील तीच तीच माणसे त्याच त्याच पदावर वर्षानुवर्षे तळ ठोकून बसत निर्धास्त होवून भ्रष्ट कारभार हाकण्यामागे नेमके गौडबंगाल काय आहे, “आंधळं दळतयं अन कुत्र पीठ खातयं ” अशीच काहीशी परिस्थिती जिल्हा परिषदेच्या कारभाराची झालेली आहे. मुळात ह्याचेच श्रेय सर्व खातेप्रमुखांनी घेण्याची गरज असून “भ्रष्टाचार मुक्त पारदर्शक काभाराची ” रॅली कधी निघणार..? जनतेच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्या भ्रष्ट प्रवृत्तींवर कठोर कारवाई कधी होणार? विविध घोटाळ्यामधीलअपहारीत रक्कमेची वसुली कधी होणार ? दोन वर्ष रखडलेली कर्मचारी प्रशासकीय स्थानांतरण प्रक्रिया कधी राबवणार ? चौकशी अंती दोष निश्चिती झालेल्या कर्मचाऱ्यांची विभागीय चौकशी प्रक्रिया कधी पार पडणार ? या जनतेच्या मनातील प्रश्नांची ठोस उत्तरे जिल्हा परिषद प्रशासनाने द्यावीत, भ्रष्ट प्रवृत्तींवर वेळीच कारवाई करावी मनसेच्या वतीने देखील जाहीर सत्कार करू..!