*कोकण Express*
*कै. अनंत उर्फ भाई नलावडे यांच्या स्मरणार्थ वैकुंठरथ नगराध्यक्षांच्याकडून कणकवली वासीयांना भेट…*
*तब्बल 5 लाख 75 हजार रुपये किमतीचा वैकुंठरथ नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी कणकवली वासियांच्या सेवेत केला हजर..*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण संकल्पना राबवत त्या सत्यात उतरवण्याचा धडाका सातत्याने सुरू असतो. अशाच उपक्रमांच्या माध्यमातून गेल्या साडेचार वर्षात नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी वेगवेगळ्या उपक्रमांमधून लोकाभिमुख कामावर भर दिला. अशाच एका नाविन्यपूर्ण उपक्रमाचे लोकार्पण नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या माध्यमातून आज गुरुवारी करण्यात आले. कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांचे वडील कै. अनंत उर्फ भाई नलावडे यांच्या स्मरणार्थ नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या माध्यमातून तब्बल 5 लाख 75 हजार रुपये किमतीचा वैकुंठरथ कणकवली शहराकरिता लोकार्पण करण्यात आला. रत्नागिरी, सिंधुदुर्ग मधील हा अशा प्रकारचा पहिला वैकुंठरथ आहे. कणकवली शहरातील कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू झाला तर या व्यक्तीला रुग्णवाहिका किंवा अन्य वाहनाद्वारे अंत्यसंस्कारासाठी न्यावे लागते. मृत्यू झालेली व्यक्ती ही गोरगरीब असली तरी मृत्यू झाल्यानंतर देखील त्या व्यक्तीचा आदर राखला जावा तसेच श्रीमंतांसोबत गोरगरिबांना देखील अशा प्रकारे एक सुविधा उपलब्ध व्हावी या दृष्टीने हा वैकुंठरथ तयार करत त्याचे लोकार्पण केल्याची माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली. टाटा कंपनीचा छोटा हत्ती हा टेम्पो खरेदी करून त्या टेम्पोमध्ये मॉडिफिकेशन करून हा वैकुंठरथ बनवण्यात आला आहे. कणकवली शहरातील मृत्यू झालेल्या कोणत्याही नागरिकांच्या कुटुंबीयांना नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या माध्यमातून हा वैकुंठरथ अंत्यविधी साठी मृतदेह नेण्यासाठी दिला जाणार आहे. या वैकुंठ रथामध्ये इंधनासहित चालकाचा खर्च देखील नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या माध्यमातून केला जाणार आहे. या वैकुंठरथाच्या मागणी करिता नगराध्यक्ष समीर नलावडे किंवा भाजपाचे शहराध्यक्ष अण्णा कोदे यांच्याशी त्यांच्या मोबाईल नंबर वर संपर्क साधावा असे देखील आवाहन करण्यात आले आहे. कणकवली शहराचे तत्कालीन ग्रामपंचायतचे पाच वर्षे उपसरपंच व त्यानंतर पंधरा वर्षे कंजूमर सोसायटीची चेअरमन राहिलेले अनंत उर्फ भाई नलावडे यांच्या स्मरणार्थ जनते च्या सेवेसाठी हा रथ उपलब्ध करण्यात आल्याचे श्री. नलावडे यांनी सांगितले.या रथाला लाईटची व्यवस्था व जय राम श्रीराम ची ऑडिओ क्लिप लावण्यात आली आहे. शिवाजी परब व प्रकाश परब यांच्याकडे चावी सोपवणार. व ते संजय मालडकर, दया पारकर, समीर पारकर, आण्णा कोदे, भरत उबाळे, रमेश काळसेकर यांच्यकडे रथाची चावी देणार. या सहा जणांना संपर्क साधा. असे आवाहन श्री नलावडे यांनी केले. भाई नलावडे यांचा कणकवली शहराशी असलेला लोकसंपर्क व कणकवली शहरात भाई नलावडे यांची आठवण तेवत रहावी व त्यांच्या राजकीय सहकाम सामाजिक कामाची आठवण राहावी या दृष्टीने हा वैकुंठ रथ लोकार्पण करण्यात आल्याचे नगराध्यक्ष श्री नलावडे यांनी सांगितले. कणकवली शहराबाहेर देखील जिल्ह्यात अन्यत्र जर हा रथ हवा असल्यास इंधनाचा खर्च व चालक यांची व्यवस्था करून हा वैकुंठ रथ न्यायचा आहे. व वापर करून झाल्यावर सर्विसिंग करून पुन्हा ताब्यात द्यायचा आहे. मात्र कणकवली शहरातील मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांनी मागणी केल्यास त्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. कणकवली नगरपंचायत जवळ हा रथ ठेवण्यात येणार असून, या रथाचे लोकार्पण आज करण्यात आले. यावेळी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, नगरसेवक अभिजीत मुसळे बंडू गांगण, नगरसेवक विराज भोसले, भरत उबाळे, आण्णा कोदे, संजय मालडकर, रमेश काळसेकर, समीर पारकर, शिवाजी परब, सदा पारकर, प्रकाश परब आधी उपस्थित होते.