*कोकण Express*
*भारतीय वनौषधींचा उपयोग आधुनिक औषध निर्मितीत होणे गरजेचे – डॉ. अरविंद नातू*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कणकवली महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागाने ‘शोध औषधांचा’ या विषयावर व्याख्यान आयोजीत केले होते. यावेळी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च (आयसर), पुणे येथील शास्त्रज्ञ डॉ. अरविंद नातू हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. त्यांनी आपल्या व्याख्यानामध्ये औषधांच्या शोधापासून ते औषधांच्या निर्मितीपर्यंतच्या वेगवेगळया टप्प्यांबद्दल माहिती दिली. त्यांनी असे सांगितले की, एखादे औषध बाजारात येण्यापूर्वी त्याचे जवळपास तीन लाख रेणू तयार करावे लागतात. त्यानंतर त्या रेणूंना वेगवेगळया जीवशास्त्रीय चाचण्यांमधून जावे लागते. मनुष्य जातीसाठी ते सुरक्षित असल्याची खात्री झाल्यानंतरच ते औषध बाजारात आणले जाते.
आज रसायनशास्त्रातील संशोधनामुळे एकाच वेळी अनेक रेणूंची निर्मिती करणे आता सुलभ झालेले आहे. भारतामध्ये मात्र अजून एकाही नवीन औषधाचा शोध लागला नाही, अशी खंत देखील डॉ. नातू यांनी व्यक्त केली. विद्यार्थ्यांनी आंतरशाखीय संशोधनाचे महत्त्व लक्षात घेऊन मूलभूत संशोधनात एकत्र काम करावयास हवे, तरच औषध निर्मितीसारखी किचकट प्रक्रिया सुलभ होऊ शकेल, असे मत व्यक्त केले.
या कार्यक्रमात प्राचार्य डॉ. राजेंद्रकुमार चौगुले यांनी ‘विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्ती वाढण्यासाठी चौकस बुद्धी असणे गरजेचे आहे’ असे मत व्यक्त केले. व जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी शास्त्रज्ञ बनावे व मानव जातीची सेवा करावी अशी अपेक्षा व्यक्त केली. या प्रसंगी डॉ. संदिप सांळुखे यांनी प्राचीन वनौषधींवर शास्त्रीय दृष्टीकोनातून संशोधन होणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान शिक्षण प्रसारक मंडळाच्या चेअरमन डॉ. राजश्री साळुंखे मॅडम यांनी भूषविले. या कार्यक्रमासाठी युरेका सायन्स क्लब, कणकवलीच्या सुषमा केणी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंकिता रहाटे यांनी केले. परिचय डॉ. शामराव डिसले यांनी करून दिला व आभार प्रदर्शन स्नेहल जाधव यांनी केले. या कार्यक्रमासाठी प्रा. हर्षदा मालंडकर, प्रयोगशाळा सहाय्यक गुरूनाथ सावंत, परिचर श्री. लाड, श्री. बाणे व श्री. भगत यांनी सहकार्य केले. या प्रसंगी विज्ञान विभागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.