*कोकण Express*
*अवैध दारू वाहतुकीविरोधात मनसेचे १२ रोजी ‘डबे वाजवा ‘ आंदोलन*
*मळेवाड विभाग अध्यक्ष मंदार नाईक यांची माहिती*
*गोवा राज्यातून अवैधरित्या होणारी दारू वाहतूक बंद करण्याची मागणी*
*सावंतवाडी । प्रतिनिधी*
गोव्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यासह राज्यात होणाऱ्या अवैध दारू वाहतुकीला त्वरित आळा घालावा अन्यथा या विरोधात प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी १२ ऑक्टोंबर रोजी सकाळी ११ वाजता इन्सुली चेकपोस्ट कार्यालयासमोर ‘डब्बे वाजवा ‘ आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा मनसेचे मळेवाड विभाग अध्यक्ष मंदार नाईक यांनी दिला आहे. गोवा राज्यातून जिल्हयात मोठ्या प्रमाणात चोरट्या दारूची अवैध वाहतूक होत आहे. चेक पोस्ट असतानाही दारू मोठ्या प्रमाणात या जिल्ह्यात व राज्यात येत आहे. यामुळे आजची तरुण पिढी मोठ्या प्रमाणात व्यसनाधीन होत आहे. व्यसन पूर्ण करायला त्यांना पैसा कमी पडत असला की चोरी मारामारी यासारखे मार्ग अवलंबून आपल्या जीवनाची वाताहत करत आहे व आपल्या कुटुंबाची बरबादी करत आहे. त्यामुळे या प्रकारांना आळा घालण्यासाठी या चोरट्या वाहतुकीला त्वरित आळा घालावा, अशी मागणी मंदार नाईक यांनी केली आहे. कोल्हापूरवरून येणारी तपासणी पथक सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध दारू वाहतुकीवर कारवाई करत आहेत. पण सिंधुदुर्गातील पथक मात्र देखाव्यासाठी कधीतरी कारवाई करून परत त्या विषयात लक्ष घालत नाही.आज जिल्ह्यात येणारी गोवा बनावटीची दारू ही सातार्डा,आरोंदा , बांदा या ठिकाणची चेक पोस्ट पार करून होते.या असल्या अवैध्य व्यवसायामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव बदनाम होत असून त्याला त्वरित आळा घालावा अशी मागणी त्यांनी प्रसिद्ध दिलेल्या पत्रकाद्वारे केली आहे.

