*कोकण Express*
*गोपुरी आश्रमात गांधी जयंती निमित्ताने व्यसनमुक्ती सप्ताहाला सुरुवात*
*कणकवली ः प्रतिनिधी*
२ ऑक्टोबर गांधी जयंती आणि लाल बहादूर शास्त्री जयंती तसेच गोपुरी आश्रमाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने गोपरी आश्रमात ‘गांधी आणि व्यसनमुक्ती’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. चर्चासत्रात गोपुरी आश्रमाचे अध्यक्ष डॉ. प्रा. राजेंद्र मुंबरकर यांनी गांधीजींच्या अनेक रचनात्मक कार्यांपैकी व्यसनमुक्ती हे कार्य तितक्याच तळमळीने व आजच्या परिस्थितीत प्रभावशाली करण्याची गरज आहे. आणि हे कार्य नशाबंदी मंडळाच्या मदतीने गेली पंधरा वर्षे गोपुरी आश्रमात सुरू आहे. गांधीजींचे अनुयायी कोकण गांधी अप्पासाहेब पटवर्धन यांनी गांधीजींच्या विचारांना कृतीत उतरविण्यासाठीच गोपुरी आश्रमाची स्थापना केली. गेली ७५ वर्ष सातत्याने सुरू आहे. हे विचार व्यक्त केले.
यावेळी गोपुरी आश्रमाचे उपाध्यक्ष रवींद्र मुसळे गुरुजी यांच्या हस्ते नशाबंदी मंडळाच्या कार्यालयाचे उद्घाटन व तसेच व्यसनमुक्ती सल्ला केंद्राचे नूतनीकरण करण्यात आले. तसेच गोपुरी आश्रमाच्या संचालिका, नशाबंदी मंडळाच्या जिल्हा संघटक अर्पिता मुंबरकर यांनी जिल्ह्यात वाढत असलेली व्यसनाधीनता थांबविण्याचा प्रयत्न यापुढे सातत्याने केला जाईल. गोपुरी आश्रमात स्थापन केलेल्या व्यसनमुक्ती सल्ला केंद्राचा समाजाने उपयोग करून घेवून व्यसनमुक्तीच्या कार्यात सहभागी व्हावे असे आवाहन केले.
या कार्यक्रमात गोपुरी आश्रमाचे खजिनदार अमोल भोगले, व्यवस्थापक बाळकृष्ण सावंत, सदाशिव राणे आणि नशाबंदी मंडळाच्या जिल्हा समिती सदस्य रीमा भोसले इत्यादी मान्यवरांनी या चर्चासत्रात भाग घेऊन आपले विचार व्यक्त केले. शेवटी जय जवान जय किसान जय व्यसनमुक्ती हा नारा देऊन कार्यक्रम संपविण्यात आला.