*कोकण Express*
*उद्योगमंत्री सामंतांचा मालवणमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का*
*देवबाग माजी सरपंच उल्हास तांडेल व महेश राणेंचा सेनेला जय महाराष्ट्र*
*राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते माजी उपसभापती नाथा मालंडकरही मुख्यमंत्री शिंदेंगटा सोबत*
*मालवण ः प्रतिनिधी*
उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मालवण तालुक्यात ठाकरे गटाला आणखी एक धक्का दिला असून देवबाग माजी सरपंच उल्हास तांडेल तसेच आमदार वैभव नाईक यांचे निकटवर्तीय कट्टर समर्थक महेश राणे यांनी सेनेला जय महाराष्ट्र करत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. आज रत्नागिरी शासकीय विश्रामगृह येथे उल्हास तांडेल, महेश राणे तसेच रामगड येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते तथा माजी पं स उपसभापती नाथा मालंडकर यांनी शेकडो प्रमुख कार्यकर्त्यांसह उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. यावेळी सुनील पारकर, माजी नगरसेवक भूषण परुळेकर, शेखर राणे,दामू सावंत आदी उपस्थित होते. महेश राणे हे आमदार वैभव नाईक यांचे अत्यंत निकटवर्तीय शिवसैनिक म्हणून आचरा परिसरात सर्वांना ज्ञात आहेत. महेश राणे यांच्या प्रवेशाने आचरा परिसरात मोठा फटका ठाकरे गटाला बसणार आहे. एकंदरीत आज झालेल्या पक्षप्रवेशाने ठाकरे गटाला मालवण तालुक्यात मोठा धक्का बसला असून शिवसेना शिंदे गटाची ताकद आणखी वाढली आहे. येत्या दसरा मेळाव्यानंतर मालवण तालुक्यात शिवसेनेचा मोठा जाहीर मेळावा घेण्यात येणार असून त्यावेळी मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश होणार आहे.

