*कोकण Express*
*लिंगाधारीत समतेला घरातूनच सुरुवात करा – कवयित्री सरिता पवार*
*गोपुरी येथे नेतृत्व विकास आणि संविधानिक मूल्यांचा जागर या शिबिराचा समारोप*
*अनुभव शिक्षा केंद्र आणि साद टीम कणकवली यांच्या वतीने करण्यात आले आयोजन*
*कणकवली ः प्रतिनिधी*
स्त्री आणि पुरुष या दोघांनीही माणूसपणाच्या व्याख्येत जगणं गरजेचं आहे. स्त्री-पुरुष यांच्यासोबत तृतीयपंथीयांनाही समाजात समान न्याय मिळायला हवा. लिंगाधारीत समानतेची आपण आपल्या घरातूनच सुरुवात करा, असे आवाहन आदर्श शिक्षिका, कवयित्री सरिता पवार यांनी केले. अनुभव शिक्षा केंद्र आणि साद टीम यांच्या संयुक्त विद्यमाने गोपुरी आश्रम वागदे येथे आयोजित केलेल्या नेतृत्व विकास आणि संविधानिक मूल्यांचा जागर या दोन दिवसीय निवासी शिबिराचा २५ सप्टेंबर रोजी समारोप झाला. यावेळी त्या बोलत होत्या. जिल्ह्यातील २५ शिबिरार्थी या शिबिरात सहभागी झाले होते. २४ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी कणकवली बार असो. उपाध्यक्ष ऍड. प्राजक्ता शिंदे, कुंभवडे तलाठी श्रीया शिंदे, वागदे सरपंच रुपेश आमडोसकर, अनुभव शिक्षा केंद्रचे जिल्हा प्रशिक्षक सहदेव पाटकर आणि साद टीम कणकवलीचे समन्वयक श्रेयश शिंदे आदी उपस्थित होते. संविधानाच्या प्रस्ताविकेने शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. तसेच प्रमुख पाहुण्यांचे स्वागतही संविधानाच्या प्रस्ताविकेची प्रत देऊन करण्यात आले.
ऍड. प्राजक्ता शिंदे यांनी कायदा बनण्याची प्रक्रिया कशी असते, त्याविषयी मार्गदर्शन केले. तसेच विविध खटल्यांच्या माध्यमातून कायदेमंडळ, कार्यकारीमंडळ आणि न्यायमंडळ यांचे कार्य कसे वेगवेगळ्या प्रकारचे असते, त्याविषयी मार्गदर्शन केले. कुंभवडे तलाठी श्रीया शिंदे यांनी नेतृत्व गुणांविषयी मार्गदर्शन करत ई पीक पाहणी विषयी आणि त्याच्या फायद्यांविषयी मार्गदर्शन केले. वागदे सरपंच रुपेश आमडोसकर यांनी गावपातळीपासून नेतृत्व क्षमतेचा विकास करण्याचे आवाहन केले. संविधान संवादक आणि साद टीम सदस्य सुजय जाधव यांनी संविधानाच्या मूल्यांविषयी शिबिरार्थींशी संवाद साधला. अनुभव शिक्षा केंद्राचे सिंधुदुर्ग जिल्हा प्रशिक्षक सहदेव पाटकर यांनी नेतृत्व गुणांविषयी विविध खेळांच्या माध्यमातून मार्गदर्शन केले. तसेच संविधानिक मूल्यांविषयी जनजागृती करणाऱ्या विविध शॉर्टफिल्म दाखविण्यात आल्या आणि त्यांवर चर्चा करण्यात आली. गोपुरी आश्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर यांनी शिबिरार्थींशी संवाद साधत वाचनाच्या माध्यमातून व्यक्तिमत्त्वात कशा प्रकारे सकारात्मक बदल घडत जातात याविषयी मार्गदर्शन केलं. आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षिका, कवयित्री सरिता पवार यांनी लिंगाधारीत न्याय याविषयी शिबिरार्थींशी मनमोकळा संवाद साधला. लिंगाधारीत समतेची सुरुवात आपल्या घरापासूनच करायला हवी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. प्रश्नोत्तराच्या माध्यमातून स्त्री-पुरुषांत खरंच समानता रुजलीय का, हे शिबिरार्थींच्या लक्षात आणून दिलं. या सत्राला शिबिरार्थींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विविध खेळ तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांनी शिबिरात रंगत आणली. या शिबिरात पालघरहून काही शिबिरार्थी सहभागी झाले होते. त्यांनी आपल्या पारंपरिक तारफा नृत्याने कार्यक्रम रंगतदार केला.
शिबिराच्या दुसऱ्या दिवशी ऍड. स्वाती तेली यांनी ‘संविधान ओळख-चर्चा’ या सत्रात संविधानाची संपूर्ण ओळख, कायदे निर्मिती प्रक्रिया याविषयी शिबिरार्थींशी संवाद साधला. साद टीम सदस्य विशाल गुरव यांनी स्वातंत्र्य आणि पर्यावरणीय न्याय या विषयावर खेळीमेळीच्या वातावरणात मार्गदर्शन केले. नेहरू युवा केंद्राचे कणकवली तालुका समन्वयक आणि साद टीम सदस्य अक्षय मोडक यांनी हिंदी दिनानिमित्त घोषवाक्य स्पर्धा आयोजित केली होती. त्याला शिबिर्थींनी उत्तम प्रतिसाद दिला. सिद्धेश कदम यांनी ज्या न्यूज चॅनेल खरी आणि नाविन्यपूर्ण माहिती देतात, त्यांची माहिती शिबिरार्थींना दिली. शिबिराचा समारोप करताना शिबिरार्थींच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यात आल्या. तसेच प्रत्येक शिबिरार्थीविषयी आपल्याला काय वाटतं, हे शिबिरार्थींनी मांडलं.
शिबीर संपन्न होण्यासाठी अनुभव शिक्षा केंद्राचे जिल्हा प्रशिक्षक सहदेव पाटकर, अनुभव साथी श्रद्धा पाटकर, साद टीम समन्वयक श्रेयश शिंदे, अनुभव शिक्षा केंद्र तालुका समन्वयक जयराम जाधव, साद टीमचे सुजय जाधव, विशाल गुरव, अक्षय मोडक, वृदाली हजारे, प्रियांका मेस्त्री, निशा कांबळी, नेहरू युवा केंद्र कुडाळ तालुका समन्वयक विल्सन फर्नांडिस, गोपुरी आश्रमाचे बाबू राणे, अमोल सावंत यांनी मेहनत घेतली. तसेच बाळू मेस्त्री यांचेही शिबीर यशस्वी होण्यासाठी मोलाचे सहकार्य लाभले. हे शिबिर अनुभव शिक्षा केंद्राचे राज्य समन्वयक सचिन नाचणेकर व गोपुरी आश्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले.