*कोकण Express*
*सिंधुदुर्गची प्राथमिक शिक्षणाची गुणवत्ता महाराष्ट्रातील शिक्षकांना आदर्शवत*
*”आहे भविष्य अपुल्या हाती” ग्रंथ प्रकाशन सोहळ्यात कवी अजय कांडर यांचे प्रतिपादन*
*शिक्षणाधिकाऱ्यांसह जिल्हा भरातील शिक्षकांची उपस्थिती*
*कणकवली/प्रतिनिधी*
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अकरा गुणवंत शिक्षकांनी ‘गुणवंत विद्यार्थ्यांना कसे घडवले जाते’ यासंदर्भातील प्रमिता तांबे संपादित “आहे भविष्य अपुल्या हाती” हे आत्मकथन लिहून महाराष्ट्रातील शैक्षणिक क्षेत्रासमोर आदर्श निर्माण केला आहे. सिंधुदुर्गातील प्राथमिक शिक्षणाची ही गुणवत्ता राज्यभरातील शिक्षकांच्या दृष्टीने अनुकरणीय आहे. त्यामुळे ज्या अकरा शिक्षकांनी आपली शैक्षणिक वाटचाल कथन केली आहे, त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच. कारण यामागे त्यांची अपार मेहनत तर आहेच परंतु त्यांची शिक्षणावरील निष्ठाही लक्षात येते; असे प्रतिपादन सुप्रसिद्ध कवी अजय कांडर यांनी येथे केले.
‘प्रभा प्रकाशन’ प्रकाशित आणि प्रमिता तांबे संपादित ‘आहे भविष्य अपुल्या हाती’ या ग्रंथाचे प्रकाशन कणकवली येथील वसंतराव आचरेकर नाट्यगृहात कवी अजय कांडर यांच्या हस्ते झाले. कवी मधुकर मातोंडकर यांनी उद्घाटन केलेल्या आणि उपशिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून कणकवली गटशिक्षणाधिकारी किशोर गवस, मालवण गटशिक्षणाधिकारी संजय माने, केंद्रप्रमुख नारायण देशमुख आदी उपस्थित होते.त्याच बरोबर प्रमिता तांबे यांच्यासह ‘आहे भविष्य अपुल्या हाती’ ग्रंथातील सहभागी शिक्षक शिवराज सावंत, सावली सुर्वे, राजश्री शेट्ये, अदिती राणे, ऋतिक राऊळ, तेजा ताटे,ज्योती पवार, पुनम खोराटे, अमोल भंडारी आदी उपस्थित होते. यावेळी श्री मातोंडकर यांनी ‘वेदाआधी तू होतास’ या बाबुराव बागुल यांच्या कवितेचे वाचन करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले.यावेळी प्रमुख पाहुण्यांबरोबरच सहभागी अकरा शिक्षकांचा स्मृतीचिन्ह शाल आणि ग्रंथ भेट देऊन गौरव करण्यात आला.
श्री आंगणे म्हणाले, मी संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात फिरतो तेव्हा एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात येते खूप चांगले काम करणारे शिक्षक मागे मागे राहत असतात. अशा शिक्षकांपैकीच हे अकरा शिक्षक आहेत. त्यामुळे सदर ग्रंथ प्रमिता तांबे यांनी संपादित करून या अकरा शिक्षकांच्या कामाला न्याय मिळवून दिला आहे.अशा प्रकारचे अजूनही खूप गुणवंत शिक्षक जिल्ह्यात आहेत. मी या सगळ्यांचे मनापासून अभिनंदन करतो. महाराष्ट्रात कोकण स्तरावरची विद्यार्थी मंडळी दहावी आणि बारावीच्या गुणवत्तेत झळकतात. यामागे गुणवत्ता सिद्ध करणाऱ्या मुलांचे प्राथमिक शिक्षण उत्तम प्रकारे करून घेणाऱ्या अशा शिक्षकांचे योगदान असते. हे आपण लक्षात ठेवले पाहिजे.
श्री गवस म्हणाले, अनेक शिक्षक प्रामाणिकपणे काम करत असतात.त्यांचे कौतुक नेहमीच केले गेले पाहिजे. या ग्रंथाच्या निमित्ताने सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्राथमिक शिक्षण कशाप्रकारचे दिले जाते हे लोकांसमोर येईल. त्यामुळे ‘आहे भविष्य अपुल्या हाती’ या ग्रंथाची निर्मिती केली गेली याबद्दल मी प्रमिता तांबे यांना धन्यवाद देतो.श्री माने म्हणाले, ‘आहे भविष्य अपुल्या हाती’ या ग्रंथात सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागातील ११ शिक्षकांचे लेखन आहे.हे लेखन म्हणजे त्यांची शिकविण्याची कृतीशीलता आहे. शिक्षक विद्यार्थ्यांशी प्रामाणिक राहतो तेव्हाच असे चांगले काम उभे राहत असते. आणि हे काम प्रमिता तांबे यांनी सर्वांपर्यंत पोहोचवले व त्या माझ्या मालवण तालुक्यात शिक्षिका आहेत याचे मला कौतुक वाटते. श्री मातोंडकर, श्री. देशमुख यांनीही विचार व्यक्त केले. तर प्रमिता तांबे यांनी सदर ग्रंथाच्या निर्मिती मागील अनुभव कथन केले.यावेळी शिवराज सावंत,
अमोल भंडारी पुनम खोराटे, ज्योती पवार या सहभागी शिक्षकांनी तसेच पालक प्रशांत दळवी यांनीही मनोगत व्यक्त केले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध भागातील बहुसंख्येने शिक्षक आणि साहित्य रसिक उपस्थित असलेल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अदिती राणे यांनी केले तर आभार ऋतिका राऊळ यांनी मानले.