*कोकण Express*
*फोंडाघाट महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय नदी दिवस साजरा*
*फोंडाघाट ःःप्रतिनिधी*
फोंडाघाट दिनांक 25 सप्टेंबर 2022 कला आणि वाणिज्य महाविद्यालय फोंडाघाटच्या एनसीसी विभागाच्यावतीने आंतरराष्ट्रीय नदी दिवस साजरा करण्यात आला. यावेळी महाविद्यालयातील एनसीसी कॅडेटनी उगवाई नदीतील प्लास्टिक जमा करून आंतरराष्ट्रीय नदी दिवस साजरा केला. या उपक्रम प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विष्णू फुलझेले यांनी कॅडेटना शुभेच्छा देऊन आपल्या गावातील नद्या सतत स्वच्छ ठेवणे हे प्रत्येक एनसीसी कॅडेटनी आपले कर्तव्य मानुन समाजात जनजागृती केली पाहिजे. कारण नद्या मुळेच मानवाचे अस्तित्व जिवंत आहे. त्यामुळे नद्या सतत स्वच्छ असल्या पाहिजेत. अशा उपक्रमाच्या माध्यमातूनच जनतेत जाणीव-जागृती होणार आहे. त्यामुळे असे दिवस साजरे झाले पाहिजेत असे सांगितले. तर एनसीसी असोसिएट ऑफिसर लेफ्ट डॉ. राज ताडेराव यांनी एनसीसी कॅडेटना मार्गदर्शन करताना सांगितले की, आज देशभरातील विविध नद्यात प्लास्टिक मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. नद्यातील प्लास्टिकमुळे पाण्यातील विविध जलचर प्राण्याप्रमाणेच मानवाचेही अस्तित्व धोक्यात येत आहे. त्यामुळे नद्यांच्या स्वच्छतेविषयी सर्वांनी जागरूक असणे गरजेचे आहे. तसेच त्यांनी आंतरराष्ट्रीय नदी दिवस साजरा करण्यामागची भूमिका कॅडेटना सांगितली. या उपक्रमासाठी डॉ. संतोष रायबोले, श्री. दीपक सावंत तसेच एनसीसी सिनियर कॅडेट स्वप्नील शिरवलकर तसेच बहुसंख्य कॅडेट हजर होते. या उपक्रमासाठी फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी व सर्व संचालक मंडळाकडून शुभेच्छा देण्यात आल्या.