*कोकण Express*
*आजच्या काळात तरुणाईच्या माध्यमातून संविधानाचा जागर होणं महत्त्वाचं – ॲड. प्राजक्ता शिंदे*
*गोपुरी येथे नेतृत्व विकास आणि संविधानिक मूल्यांचा जागर या शिबिराचे उद्घाटन संपन्न*
*अनुभव शिक्षा केंद्र आणि साद टीम कणकवली यांच्या वतीने आयोजन*
*कणकवली ः प्रतिनिधी*
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वसमावेशक विचार करून भारताच्या संविधानाची निर्मिती केली. या संविधानाने प्रत्येकाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार बहाल केला. आजच्या काळात संविधानाच्या मूल्यांचा जागर होणं आणि त्यात तरुणाईने पुढाकार घेणं, हे खूप महत्त्वाचे आहे, असे मत कणकवली बार असो. च्या उपाध्यक्ष ऍड. प्राजक्ता शिंदे यांनी व्यक्त केले. अनुभव शिक्षा केंद्र आणि साद टीम यांच्या संयुक्त विद्यमाने गोपुरी आश्रम वागदे येथे आयोजित केलेल्या नेतृत्व विकास आणि संविधानिक मूल्यांचा जागर या दोन दिवसीय निवासी शिबिराचे आज उद्घाटन करण्यात आले. यावेळी कणकवली बार असो. उपाध्यक्ष ऍड. प्राजक्ता शिंदे, कुंभवडे तलाठी श्रीया शिंदे आणि वागदे सरपंच रुपेश आमडोसकर, अनुभव शिक्षा केंद्रचे जिल्हा प्रशिक्षक सहदेव पाटकर, साद टीम कणकवली चे समन्वयक श्रेयश शिंदे आदी प्रमुख उपस्थित होते.
जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारत देशाचे संविधान हा या देशाचा आत्मा आहे. कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ अशा तीन भागांत भारतीय संविधानाचे कार्य चालते. कोणत्याही एकाच घटकाकडे संपूर्ण अधिकार बहाल न केल्याने देशाचा समतोल आणि स्वातंत्र्य अबाधित राहिले आहे, असे मत ऍड. शिंदे यांनी व्यक्त केले. गोपुरी आश्रम आणि नेहरू युवा केंद्राच्या माध्यमातून विविध व्यक्तिमत्त्व विकासाची शिबिरे राबविली. त्यामुळे वेळेचे नियोजन, प्रामाणिकपणा, नेतृत्व क्षमता अशा गुणांना प्रोत्साहन मिळाले. अशा शिबिरक्तउन जे शिकता ते आत्मसात करून त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करा, असे आवाहन कुंभवडे तलाठी श्रीया शिंदे यांनी केले. वागदे सरपंच रुपेश आमडोसकर यांनी नेतृत्व गुणांविषयी मार्गदर्शन करताना सांगितले की आपल्या गावापासून आपल्या नेतृत्व क्षमतेचा विकास करा आणि सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी काम करा. नेतृत्त्वला प्रमाणिकपणाची साथ असेल तर त्याची जाण समाज कायम ठेवतो, असे रुपेश आमडोसकर म्हणाले.
संविधानाच्या प्रस्ताविकेने शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. प्रमुख पाहुण्यांना संविधानाच्या प्रस्ताविकेची प्रत देऊन स्वागत करण्यात आले. अनुभव साथी श्रद्धा पाटकर यांनी सूत्रसंचालन केले. तर साद टीमच्या सुजय जाधव यांनी मान्यवरांचे आभार मानले. यावेळी अनुभव शिक्षा केंद्र तालुका समन्वयक जयराम जाधव, नेहरू युवा केंद्र कुडाळ तालुका समन्वयक विल्सन फर्नांडिस, कणकवली तालुका समन्वयक अक्षय मोडक आदी उपस्थित होते. हे निवासी शिबीर दोन दिवसीय असून उद्या संध्याकाळी चार वाजता शिबिराचा समारोप होणार आहे.