*कोकण Express*
*सीएमएस-झिरो वन या दळणवळण उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण*
इस्रोच्या सीएमएस-झिरो वन या दळणवळण उपग्रहाचं आज यशस्वी प्रक्षेपण झालं. श्रीहरीकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून दुपारी ३ वाजून ४१ मिनिटांनी पीएसएलव्ही सी-फीफ्टी रॉकेटच्या सहाय्यानं या उपग्रहाचं प्रक्षेपण झालं आणि २१ मिनिटांमधे तो भू-समकालिक कक्षेत पोचला.
असे काही टप्पे गाठत येत्या २१ तारखेला तो निर्धारित कक्षेत स्थिरावेल. हा इस्रोचा ४२ वा दळणवळण उपग्रह आहे. या उपग्रहाद्वारे दूरचित्रवाणीच्या दृष्य गुणवत्तेत सुधारणा होणार आहे. टेलिमेडिसीन, टेलिएज्यूकेशन तसंच आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रातही मदत होणार आहे.
इस्रोचे अध्यक्ष डॉ. के सिवन यांनी या यशाबद्दल इस्रो पथकाचं अभिनंदन केलं आहे. इस्रो येत्या काही दिवसांत आणखी उपग्रह आकाशात सोडणार आहे. चांद्रयान तीन, गगनयान तसंच सूर्याचा अभ्यास करण्यासाठी आदित्य एस-वन या महत्वाकांक्षी उपक्रमांचं कामही गतिमान असल्याचं त्यांनी सांगितलं.