*कोकण Express*
*शासकीय वैद्यकीय महविद्यालयातील भ्रष्टाचाराची करण्यात यावी उच्चस्तरीय चौकशी*
*मनसे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांची वैद्यकीय शिक्षण व आयुष मंत्रालयाकडे मागणी*
*सिंधुदुर्गनगरी ः प्रतिनिधी*
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सिंधुदुर्ग कडील जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या भ्रष्ट, मनमानी व भोंगळ कारभाराची गंभीर दखल घेवून तात्काळ उच्चस्तरीय चौकशी करावी अशी मागणी मनसे कुडाळ तालुका अध्यक्ष प्रसाद गावडे यांनी वैद्यकीय शिक्षण व आयुष्य मंत्रालयाचे आयुक्त यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कुडाळ तालुका अध्यक्ष प्रसाद गावडे यांनी वैद्यकीय शिक्षण आयुक्त यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,सिंधुदुर्ग या आस्थापनेवरील जबाबदार वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या भ्रष्ट, मनमानी व बेजबाबदार कारभाराची गंभीर दखल घेवून वैद्यकीय महाविद्यालय, सिंधुदुर्ग आस्थापनेकडील आतापर्यत झालेली सर्व सर्व खरेदी, कार्यालयीन खर्च व निविदा प्रक्रियांची उच्चस्तरीय चौकशी करावी अशी मागणी वजा विनंती संदर्भ पत्रान्वये यापूर्वीच आपले कार्यालयाकडे केलेली आहे. सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेजमध्ये २० सप्टेंबर २०२२ रोजी रात्री घडलेली घटना पाहता शासकीय निधीवर निव्वळ डल्ला मारणे हेच एकमेव उद्दिष्ट वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. मोरे यांचे असल्याचे उघड झाले आहे. २० सप्टेंबर २०२२ रोजी रात्रभर कोल्हापूर जिल्ह्यातील एक पुरवठादार कंत्राटदार (बनियनवर) व प्रयोगशाळा तंत्रज्ञ कर्मचारी श्री.जाधव हे कार्यालयातील खरेदी नस्तीमधील कागदपत्रांची अदलाबदल करत असल्याचे आढळून आले. रात्रभर कार्यालयात होत असलेल्या प्रकाराची मुख्य प्रशासकीय अधिकारी श्री. नवले व कार्यालय अधीक्षक श्री. गुजर यांना कोणतीही कल्पना नसल्याने त्यांनी झालेल्या प्रकारची पोलिस अधीक्षकांकडे तक्रार देखील केलेली आहे. या गैरप्रकाराबाबत मनसेच्या माध्यमातून विचारणा केली असता अधिष्ठातांनी कारवाई करतो असे सांगून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला .मात्र कोल्हापूर येथील कंत्राटदार रात्रीच्या वेळेस कार्यालयात काय करत होता,कार्यालयीन नस्ती पाहण्याचे अधिकार त्याला कोणी दिले,प्रयोगशाळा तंत्रज्ञ म्हणून कार्यरत कर्मचाऱ्याला रात्रीच्या वेळेस खरेदी संदर्भातील नस्ती पुरवठादाराला सोबत घेवून पाहण्यामागे नेमका काय उद्देश होता, पुरवठादाराशी संगनमत करून निविदा मॅनेज करत शासन निधीचा अपहार करण्याचे षडयंत्र नेमके कोणाच्या आदेशान्वये चालू होते, कार्यालयाच्या संगणकावरील मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा डेटा चोरीस जावून कोणताही अनुचित प्रकार घडल्यास कोण जबाबदार राहणार होते असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
चार महिन्यांपूर्वी खरेदी केलेल्या खुर्च्या मोडलेल्या अवस्थेत आढळून आल्या, कार्यालयीन डेस्क दुर्दशावस्थेत दिसून येतात, खरेदी केलेल्या LED टी.व्ही. धूळ खात पडलेले आहेत, मुख्य प्रशासकीय अधिकारी व कार्यालय अधीक्षक आपल्याकडे कार्यासनाकडे कोणत्याही फाईल्स सहीसाठी आणल्या जात नाहीत. असे जाहीर सांगतात ते पाहता एकूणच वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार हा भ्रष्ट असून “आंधळं दळतयं अन कुत्र पीठ खातय” असाच आहे असे दिसून येत आहे. सिंधुदुर्ग जिल्हा मेडिकल कॉलेज विविध खरेदी आडून मलई खाण्यासाठी आहे की आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी आहे. असा प्रश्न उपस्थित होत असून आपण या सर्व प्रकारची गंभीर दखल घेवून वेळीच सखोल चौकशी करून संबंधितावर कठोर कारवाई करावी अशी मागणी या निवेदनातून प्रसाद गावडे यांनी केली आहे.