*कोकण Express*
*जोपर्यंत शासन निर्णय घेत नाही, तोपर्यंत गेट उघडला जाणार नाही; कुडाळात मनसे आक्रमक*
*कुडाळ ः प्रतिनिधी*
एस्.टी. महामंडळाचे २० कर्मचारी बी.एस्.टी.ची सेवा बजावण्यासाठी मुंबई येथे पाठविण्यात आले होते. मात्र, त्यांचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कुडाळ परिसरात खळबळ उडाली आहे. संबंधित २० एस्.टी. कर्मचाऱ्यांचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार आहे. शिवाय त्या वीस कोरोना पॉझिटिव्ह कर्मचार्यांच्या बाबतीत परिवहन मंडळाने त्यांच्या कॉरंटाईन बाबतची कोणतीही कारवाई केली नाही. तसेच ते वीसही कर्मचारी आपल्या घरी व गावात मोकाट फिरत आहेत. यावरून कोरोनाचा प्रादुर्भाव नक्कीच वाढणार असल्याने जोपर्यंत शासन निर्णय घेत नाही, तोपर्यंत एस्.टी. महामंडळाचा गेट उघडला जाणार नाही. असा आक्रमक पवित्रा घेत मनसेचे जिल्हाध्यक्ष धीरज परब, महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेना जिल्हाध्यक्ष राजू कासकर, उपाध्यक्ष जगन्नाथ उर्फ बनी नाडकर्णी, जिल्हा कार्याध्यक्ष संतोष भैरवकर, मालवण माजी तालुकाध्यक्ष गणेश वाईरकर, कुडाळ तालुकाध्यक्ष जगन्नाथ गावडे, महाराष्ट्र सैनिक रमाकांत नाईक, सुबोध परब आदींनी कुडाळ एस्.टी. परिवहन मंडळाला जाब विचारण्यासाठी धडक दिल्याची माहिती जिल्हाध्यक्ष धीरज परब व जिल्हा कामगार सेना उपाध्यक्ष बनी नाडकर्णी यांनी दिली.
दरम्यान, एस्.टी. प्रशासनाने खाकी वर्दी चा आधार घेऊन जाब विचारण्याऱ्या मनसे पदाधिकाऱ्यांचा आवाज चिरडून टाकण्याचा प्रयत्न केला व मनसे पदाधिकाऱ्यांना कुडाळ पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानंतर पोलिसांनी सर्व मनसे पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेऊन सोडून दिल्याचे श्री धीरज परब व बनी नाडकर्णी यांनी सांगितले.