*कोकण Express*
*श्री ऑटोमोबाईल्सचे मालक संजय ढेकणे यांचे निधन*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कणकवली-मधलीवाडी येथील रहिवासी आणि श्री ऑटोमोबाईल्स स्पेअर पार्ट दुकानाचे मालक संजय दिवाकर ढेकणे (45) यांचे गुरूवारी सायंकाळी 7.30 वा. च्या सुमारास कणकवलीतील खाजगी रूग्णालयात हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. शांत, संयमी आणि मनमिळावू स्वभाव असलेल्या संजय ढेकणे यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबियांवर आणि मित्रपरिवारावर शोककळा पसरली आहे.
संजय ढेकणे यांना गुरूवारी सायंकाळी अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना उपचारासाठी खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती अधिकच खालावल्याने उपचार सुरू असताना सायंकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. कणकवलीत त्यांचे ट्रॅक्टर, जेसीबीच्या स्पेअरपार्टचे दुकान होते. अतिशय शांत, हसतमुख स्वभाव असलेले संजय ढेकणे यांचा मित्रपरिवार मोठा होता. कणकवलीच्या सामाजिक, सांस्कृतिक उपक्रमातही ते पुढे असायचे. आ. वैभव नाईक यांचे ते अतिशय निकटवर्तीय होते. सायंकाळी त्यांच्या निधनाची बातमी समजताच मित्रपरिवाराने खाजगी रूग्णालयात धाव घेतली. त्यांच्या कुटुंबियांसाठी हा मोठा धक्काच आहे. त्यांच्या निधनाने कणकवली शहरात हळहळ व्यक्त होत आहे. संजय ढेकणे यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुली, भाऊ, बहिणी असा परिवार आहे.