*कोकण Express*
*कोरोना योध्दे महाराष्ट्र रक्षक पुरस्काराने सन्मानित !*
*सा. प्रकट महाराष्ट्र व डिजिटल मिडीया यांचा द्वितीय वर्धापनदिन*
*सिंधुदुर्ग, दि. 18:*
सा. प्रकट महाराष्ट्र व डिजिटल मिडीया यांचा द्वितीय वर्धापनदिन कणकवलीच्या नगरपंचायत सभागृहात कणकवलीचे तहसिलदार रमेश पवार व पोलिस निरिक्षक सचिन हुंबेळकर यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. यावेळी विविध विभागात जनतेची सेवा करणाऱ्या ३० समाजसेवक व कोरोना योद्याना “महाराष्ट्र रक्षक” हा पुरस्कार उपस्थित पाहूण्यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा तिवरे खालची वाडीच्या विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर केले. दोन्ही माध्यमांचे संपादक दत्ताराम वळवी यांनी ग्रामिण भागातील समस्या सोडविण्यासाठी व नवोदितांना पत्रकारीतेत वाव मिळण्यासाठी या दोन्ही माध्यमांचे व्यासपिठ उपलब्ध करुन देण्यात आल्याचे आपल्या प्रस्तावनेत सांगितले.
आपल्या जबाबदारीतून वेळ काढून जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी उपलब्ध करुन दिलेल्या दोन्ही माध्यमांचे रमेश पवार यांनी आपल्या मार्गदर्शनात स्वागत करुन आयोजकांचे अभिनंदन केले. तर पोलिस निरिक्षक सचिन हुंबेळकर यांनी सा. प्रकट महाराष्ट्र सारखीच वर्तमानपत्रे व वृत्तवाहिनीमुळे सर्वसामान्य जनतेच्या समस्यांना वाचा फोडण्याचे काम या माध्यमांमुळे चांगल्या प्रकारे होत आहे याचे अभिनंदन करुन त्यांना शुभेच्छा दिल्या.
मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल कामगार युनियनचे सेक्रेटरी व कामगार नेते विद्याधर राणे यांनी दोन्ही माध्यमांच्या गेल्या दोन वर्षच्या कार्याची प्रशंसा केली. आणि ज्येष्ठ पत्रकार आनंद अंधारी आपल्या साठ वर्षांच्या पत्रकारितेतील अनुभव सांगुन नवोदितांना मार्गदर्शन केले. सहसंपादक महम्मद मोनये, रविंद्र कोतापकर, सुनिल देवरुखकर यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मेहनत घेतली. तर वृत्तनिवेदिका फिजा मोनये यांनी या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन केले.