कणकवली शहरात आणखी एक नवीन रस्ता साकारणार

कणकवली शहरात आणखी एक नवीन रस्ता साकारणार

*कोकण Express*

*कणकवली शहरात आणखी एक नवीन रस्ता साकारणार!*

*प्रांत कार्यालयाच्या बाजूने कॉलेज रोडला जोडणार; वाहतूक समस्या मिटणार!*

*कणकवली ः प्रतिनिधी*

विकासाचा मार्ग हा रस्ते ठरवित असतात याची प्रचिती कणकवली शहरात येऊ लागली असून आता कणकवली शहरात अजून एक नवीन रस्ता अस्तित्वात आणण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत. कणकवली शहरातील प्रांत कार्यालयाकडून ॲड. उमेश सावंत यांच्या घरालगत ते प्रांत कार्यालयाच्या मागील बाजूस कॉलेज रोडला जोडणारा एक नवीन रस्ता अस्तित्वात आणण्याच्या दृष्टीने कणकवली नगरपंचायतचे नगराध्यक्ष समीर नलावडे ,उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांच्याकडून कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.हा रस्ता झाल्यास वाहतूक कोंडीबरोबरच अनेक प्रश्न निकाली निघणार आहेत.

कणकवली नगरपंचायत च्या सत्ताधाऱ्यांकडून अनेक नवनवीन रस्ते अस्तित्वात आणण्याचा संकल्प व तो संकल्प सत्यात उतरवण्याचा धडाका सुरू आहे. त्या अनुषंगाने नुकतीच नगराध्यक्ष समीर नलावडे ,उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी नगरपंचायत कर्मचाऱ्यांसह संयुक्त पाहणी देखील केली. 9 मीटर रुंदी व सुमारे ७० मीटर लांबी अशा स्वरूपाचा हा रस्ता असणार असून, या रस्त्यामुळे सध्याच्या कणकवली तहसीलदार कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावरून वळून कॉलेज रोडला जाण्याचा मार्ग थेट सुरू होणार आहे. मात्र यात महाराष्ट्र शासनाच्या मालकीची असलेली प्रांताधिकारी कार्यालयाची काही जमीन व प्रांताधिकारी कार्यालयाची शेड, स्वच्छतागृह, तसेच पाण्याची टाकी काढण्याची गरज असल्याचे प्राथमिक सर्वेमध्ये समोर आले आहे. तर ॲड. उमेश सावंत यांची देखील काही जमीन या रस्त्यासाठी जाणार आहे. मात्र हा रस्ता नव्याने झाल्यास कणकवली तहसीलदार कार्यालय प्रवेशद्वाराकडून प्रांत कार्यालयाच्या मागाहून कॉलेज रोडला जावे लागत असणारा वळसा कमी होऊन कणकवली प्रांत कार्यालयाच्या गडग्याकडून ते ॲड. उमेश सावंत यांच्या निवास्थानाकडून ते थेट कॉलेज रोडला हा रस्ता जोडला गेल्यास हा वळसा कमी होऊन एक नवीन रस्ता कणकवलीवासियांना वाहतुकीस उपलब्ध होणार आहे. नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी या रस्त्याच्या अनुषंगाने प्रत्यक्ष कार्यवाही करण्याची ग्वाही दिली. ज्यावेळी प्रांताधिकारी व तहसीलदार यांच्याकडून प्रांताधिकारी कार्यालयाकडील जमिनी संदर्भात निर्णय होऊन या संदर्भात आवश्यक त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची मंजुरी मिळाल्यानंतर या रस्त्याचा मार्ग मोकळा होणार आहे. तसेच ही मंजुरी मिळाल्यावर तातडीने नगरपंचायत कडून या रस्त्या करिता लागणाऱ्या निधीचे अंदाजपत्रक तयार करून त्यानुसार निधी देखील तात्काळ मंजूर करून घेतला जाईल अशी माहिती समीर नलावडे यांनी दिली. सध्या प्रांताधिकारी कार्यालयाच्या गेट कडून तहसीलदार कार्यालयाच्या दिशेने जाणारा रस्ता हा महसूल विभागाच्या जागेतून आहे. जर नवीन 9 मीटर रुंदीचा व 70 मीटर लांबीचा रस्ता अस्तित्वात आला तर प्रांताधिकारी कार्यालयाच्या मागील बाजूस असलेला रस्ता व तहसीलदार कार्यालयाच्या गडग्या पर्यतची जमीन ही प्रांताधिकारी कार्यालयाला वापरण्यास उपलब्ध होणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रांताधिकारी कार्यालयाची जी रस्त्याला जाणारी जमीन आहे त्याऐवजी ही मागील जमीन वापरण्यास मिळू शकते. मात्र याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. दरम्यान कणकवली नगरपंचायतकडून या रस्त्याकरिता सकारात्मक भूमिका घेण्यात आल्यानंतर नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी यासंदर्भात कणकवली तहसीलदार आर. जे. पवार यांच्याशी देखील चर्चा केल्याचे सांगण्यात आले. त्या चर्चेनुसार तहसीलदार देखील या रस्त्या करिता सकारात्मक असल्याची माहिती समीर नलावडे यांनी दिली. मात्र याबाबत लवकरच प्रांताधिकार्‍यांशी चर्चा करून प्रत्यक्ष रस्त्या करिता जमीन घेण्यास परवानगी बाबत अधिकृत पत्र व्यवहार करण्याची मागणी करण्यात येणार असल्याचे श्री. नलावडे यांनी सांगितले. व त्यानंतर आम. नितेश राणे यांच्या माध्यमातून तात्काळ या रस्त्या करिता निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात येणार असल्याचे समीर नलावडे यांनी सांगितले. कणकवली तहसील कार्यालयाकडील अरुंद रस्त्यामुळे अनेकदा वाहतूक समस्या निर्माण होत होती.महामार्गावरून वळताना अपघाताची शक्यता नेहमीच असायची मात्र या रस्त्यामुळे हा प्रश्र्न सुटणार आहे. कणकवली शहरात गेल्या काही वर्षांत विविध रस्त्यांचे जाळे विणले जात असून रिंग रोड व अन्य रस्ते साकारले गेले आहेत व साकारले जात आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!