न्याहरी-निवास व्यावसायिकांसाठी देवबागला २८ रोजी कार्यशाळा

न्याहरी-निवास व्यावसायिकांसाठी देवबागला २८ रोजी कार्यशाळा

*कोकण Express*

*न्याहरी-निवास व्यावसायिकांसाठी देवबागला २८ रोजी कार्यशाळा*

*केंद्रीय पर्यटन मंत्र्यांची उपस्थिती लाभणार, बाबा मोंडकर यांची माहिती*

*मालवण  ःःप्रतिनिधी* 

कोरोना काळानंतर पर्यटन व्यवसाय नव्याने उभारी घेत असून येथील पर्यटन व्यावसायिकांना मजबुती देण्याच्या दृष्टीने पर्यटन दिनाच्या निमित्ताने केंद्रीय पर्यटन मंत्रालय आणि जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने न्याहरी – निवास व्यावसायिकांसाठी २८ सप्टेंबर रोजी देवबाग येथील समर्थ सिनेमागृह येथे अतिथी गृह व्यवस्थापन तसेच वर्तन कौशल्य कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. तसेच यावेळी न्याहरी निवास धारकांची शासनाच्या पोर्टलवर नोंदणी होण्यासाठी मार्गदर्शन व प्रयत्न केले जाणार आहेत. या कार्यशाळेस केंद्रीय पर्यटन मंत्री केंद्रीय पर्यटनमंत्री श्रीपाद नाईक, भारत पर्यटनचे संचालक व्यंकटेशन दत्तात्रेयन यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे, अशी माहिती जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघाचे अध्यक्ष बाबा मोंडकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मालवण येथील हॉटेल रुचिरा येथे पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी महासंघाचे अध्यक्ष बाबा मोंडकर, तालुकाध्यक्ष अविनाश सामंत, शहराध्यक्ष मंगेश जावकर, तारकर्ली पर्यटन विकास संस्थेचे अध्यक्ष सहदेव साळगावकर, मेघा सावंत, विद्या फर्नांडिस, प्रवीण रेवंडकर आदी उपस्थित होते.

यावेळी बाबा मोंडकर म्हणाले, येथील पर्यटन व्यावसायिकांना मजबुती देण्यासाठी शासनाकडून काही कार्यक्रम राबविण्यात यावेत यासाठी महासंघाकडून करण्यात आलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. या अंतर्गत पर्यटन दिनाचे औचित्य साधून २८ सप्टेंबरला देवबाग येथे न्याहरी निवास धारकांसाठी अतिथी गृह व्यवस्थापन तसेच वर्तन कौशल्य कार्यशाळा आयोजित केली आहे. या कार्यशाळेस भारत पर्यटनच्या माजी संचालक नीला लाड, उपसंचालक जगदीप ठोंबरे, भावना शिंदे, खादी ग्रामोद्योगचे जिल्हा संचालक आनंद कर्णिक, जिल्हा बँक चेअरमन मनीष दळवी, महाराष्ट्र टुर ऑपरेटर असोसिएशनचे उदय कदम, पर्यटन व्यावसायिक महासंघाचे सचिव नकुल पार्सेकर, महासंघाचे मालवण तालुका अध्यक्ष अविनाश सामंत, सावंतवाडी अध्यक्ष जितेंद्र पंडित, वेंगुर्ले अध्यक्ष महेश सामंत, आयएचएम गोवा येथील तज्ज्ञ मार्गदर्शक अभिषेक भोसले, उमेश बोडके आदी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. प्रथम नोंदणी करणाऱ्या १०० व्यावसायिकांना या कार्यशाळेत सहभागी होता येईल. नावनोंदणी साठी ९४२११५३०३५ या क्रमांकावर स्वतःचे नाव व व्यवसायाचे नाव पाठवावे, असेही बाबा मोंडकर म्हणाले.

आज न्याहरी निवास धारक व्यावसायिकांची शासन दरबारी नोंदणी नाही. म्हणूनच भारत सरकारच्या पर्यटन संचालनालच्या पोर्टल वर न्याहरी निवास धारकांची नोंदणी करण्यासाठी या कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या कार्यशाळेस तारकर्ली पर्यटन विकास संस्थेचे सहकार्य लाभणार आहे. तसेच पर्यटन व्यावसायिकांसाठी असणाऱ्या शासनाच्या विविध अनुदान- कर्ज योजनांचा लाभ व्यावसायिकांना होण्यासाठी देखील मार्गदर्शन करण्यात येणार असून याबाबत आर्थिक साहाय्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सहकार्य घेतले जाणार असून याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी हे उपस्थित राहणार आहेत, असेही बाबा मोंडकर म्हणाले.

तसेच या कार्यशाळेत महासंघातर्फे घेण्यात आलेल्या स्पर्धांचे बक्षीस वितरण होणार आहे. यातील फोटोग्राफी स्पर्धेतील विजेते प्रथम- संजय खराडे, द्वितीय- शैलेश दाभोलकर, तृतीय- वैभव केळकर, केक स्पर्धा- प्रथम- प्रज्ञा लुगेरा, द्वितीय- शेफाली महाडिक, तृतीय- साहिल सावंत, उत्तेजनार्थ- सिमरन सावंत, सुप्रिया पेंडूरकर यांना बक्षिसे देऊन गौरविण्यात येणार आहे, अशी माहितीही बाबा मोंडकर यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!