कणकवली दुय्यम निबंधक कार्यालय शासकीय की खाजगी? : राजेश जाधव

कणकवली दुय्यम निबंधक कार्यालय शासकीय की खाजगी? : राजेश जाधव

*कोकण Express*

*कणकवली दुय्यम निबंधक कार्यालय शासकीय की खाजगी? : राजेश जाधव*

*कासार्डे; संजय भोसले*

कणकवली येथील दुय्यम निबंधक कार्यालय हे शासकीय की खाजगी असा उपरोधिक सवाल सामाजिक कार्यकर्ते तथा ह्युमन राईट्सचे कणकवली तालुका उपाध्यक्ष राजेश जाधव यांनी उपस्थित केला आहे.

कणकवली येथिल तहसीलदार यांचे मुख्य प्रशासकीय इमारतीत दुय्यम निबंधक यांचे कार्यालय आहे. निरनिराळ्या दस्तऐवजांच्या नोंदणीकरिता या कार्यालयात नेहमीच नागरिकांची वर्दळ असते. परंतु संबंधित कार्यालयात कार्यरत असलेल्या नेमक्या शासकीय व्यक्ती कोण? हेच नेमके तिथे कामानिमित्त आलेल्या सर्वसामान्य नागरिकांना कळेनासे झाले आहे.

याचे कारण असे की, संबंधीत कार्यालयात काही खाजगी व्यक्ती या आपण तेथीलच शासकीय व्यक्ती असल्याच्या अविर्भावात वावरून सर्वसामान्य नागरिकांची दिशाभूल करीत आहेत. सदरच्या खाजगी व्यक्ती संबंधित कार्यालयातील टेबल – खुर्च्या, सील – शिक्के, नोंदणीकरिता आलेले नागरिकांचे दस्तऐवज इ. शासकीय सामग्री – मालमत्तेचा अनधिकृतपणे व बिनदिक्कतपणे वापर करीत आहेत. तसेच नागरिकांना त्यांच्या दस्तऐवजांच्या नोंदणीकरिता मदत करतो असे भासवून त्यांच्याकडून आर्थिक मोबदला उकळत असून असा आर्थिक मोबदला देण्याचे टाळल्यास संबंधित सर्वसामान्य नागरिकांना वेगवेगळ्या फोनवरून संपर्क करणे व पुन्हा आर्थिक मोबदल्याची मागणी करणे असे प्रकार घडत आहेत. त्यातून नाहक असा आर्थिक भुर्दंड व मानसिक त्रास सर्वसामान्य नागरिकांना सोसावा लागत आहे. विशेष म्हणजे संबंधित कार्यालयात शासकीय व्यक्ती असल्याच्या अविर्भावात काही खाजगी व्यक्तींचा सुरू असलेला वावर व त्यांच्याकडून शासकीय सामग्री – मालमत्तेची होत असलेला हाताळणी वापर या सर्व बाबी अनधिकृतपणे व बिनदिक्कतपणे संबंधित दुय्यम निबंधक यांचे कार्यालयात त्यांच्या नजरेसमोर सुरू असून देखील त्यांच्याकडून अशा प्रकारच्या सर्व प्रकारांवर निर्बंध का घातले जात नाहीत? हा खरेतर आश्चर्याचा व संशोधनाचाच प्रश्न आहे.

याबाबत आपण दुय्यम निबंधक कणकवली यांचे जिल्हा व विभागीय पातळीवरील वरिष्ठ स्तरावर संपर्क साधून तेथील संबंधित अधिकारी वर्गाशी आवश्यक तो चर्चा-विनिमय केलेला आहे. तरी देखील दुय्यम निबंधक कणकवली यांचे कार्यालयातील खाजगी व्यक्तींच्या अनधिकृत वावरास संबंधितांकडून निर्बंध न करण्यात आल्यास व घडत असलेल्या गैरप्रकारांना आळा न बसल्यास त्याविरोधात पुराव्यासहित लेखी तक्रार नोंदविणार असल्याची माहिती राजेश जाधव यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!