*कोकण Express*
*मत्स्य संपदा योजनेचा लाभ वेंगुर्ला-सावंतवाडी तालुक्यातील गाबीत बांधवानी मोठया प्रमाणावर घेऊन आपली आर्थिक प्रगती करावी…..*
*माजी आ. परशुराम उपरकर*
*वेंगुर्ला ः प्रतिनिधी*
वेंगुर्ला व सावंतवाडी तालुक्यातील किनारपट्टी परिसरात आमच्या गाबीत समाजातील बांधव मोठया प्रमाणात मच्छिमारी व्यवसाय करतात परंतु त्यांची म्हणावी तशी प्रगती झालेली नाही. मात्र बऱ्याच वर्षानंतर केंद्र शासनाने जाहीर केलेल्या मत्स्य संपदा योजनेचा लाभ घेऊन आपली आर्थिक प्रगती साधावी असे आवाहन अखिल भारतीय गाबीत समाजाचे अध्यक्ष माजी आमदार श्री. परशुराम उपरकर यांनी वेंगुर्ला येथील मत्स्यसंपदा योजना प्रशिक्षण शिबिरात बोलताना केले.
याप्रसंगी प्रास्ताविक गाबीत समाज सिंधुदुर्गचे जिल्हा संघटक श्री. चंद्रशेखर उपरकर यांनी केले. यावेळी व्यासपीठावर अखिल भारतीय गाबीत समाजचे माजी अध्यक्ष ऍड. काशिनाथ तारी, कार्याध्यक्ष श्री. दिगंबर गावकर, गाबीत समाज महाराष्ट्र चे अध्यक्ष श्री. सुजय धुरत, उपाध्यक्ष श्री. बबन सारंग, तालुका माजी अध्यक्ष श्री. वसंत तांडेल, मत्स्य खात्याचे अधिकारी श्री. देवकर व जोशी हे उपस्थित होते.
मत्स्य संपदा योजनेमध्ये बायोफ्लॅक, केज कल्चर, रास, समुद्र शेवाळ, मत्स्य बीज तयार करणे, मत्स्य उत्पादन वाढविणे, मासे टिकवण्यासाठी बर्फ कारखाना, रेफ्रिजरेटर, इ-रिक्षा, इन्शुलेटेड व्हॅन, मासे विक्रीसाठी सायकल,चारचाकी, मोटारसायकल,मत्स्यविक्री बाजारपेठ तयार करणे,जुनी नौका नवीन करणे,बोटीवर आधुनिककरण करणे, प्रशिक्षण देणें, बोटिंवर बायोटॉयलेट बांधणे अशा अनेक योजनांचा समावेश आहे.त्यांची इत्यंभूत माहिती देण्यात आली.
शेवटी श्री. वसंत तांडेल यांनी सर्वांचे आभार मानले.