*कोकण Express*
*शेतक-यानी शेळीपालनातून आर्थिक सक्षम बनावे.* – भास्कर काजरेकर*
*फोंडाघाट महाविद्यालयात शेळीपालन प्रशिक्षण*
*फोंडाघाट ःःप्रतिनिधी*
भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली पुरस्कृत, सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान संचलित – कृषी विज्ञान केंद्र किर्लोस मार्फत आणि प्रदीप सावंत ऊर्फ आबूसाहेब पटेल मित्रमंडळ व राष्ट्रीय सेवा योजना विभाग, कला आणि वाणिज्य महाविद्यालय फोंडाघाट यांच्या संयुक्त विद्यमाने फोंडाघाट महाविद्यालयात दिनांक १२ ते १५ सप्टेंबर २०२२ या कालावधीत होणा-या शेळीपालन प्रशिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन सुभाष सावंत यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख भास्कर काजरेकर, फोंडाघाट महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विष्णु फुलझेले, आबूसाहेब पटेल, राजेंद्र सावंत, शांताराम रावराणे, राजू रावराणे, पिंटू पटेल, प्रशिक्षक डॉ. केशव देसाई, सौ. माधवी दळवी, साै. तृप्ती सावंत इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
भास्कर काजरेकर म्हणाले की, कृषी विज्ञान केंद्रामार्फत “समृद्ध व आनंदी गाव” संकल्पनेतून ग्रामीण भागातील लोकांना रोजगार व स्वयंरोजगार मिळवून देऊन आर्थिक सक्षम बनविण्यासाठी विविध उपक्रमांची व प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येते. विविध शेतीपूरक व्यवसाय अद्ययावत तंत्रज्ञानाच्या साह्याने सुरू करण्याकरता आम्ही मदत व मार्गदर्शन करत असताे. प्रशिक्षणानंतर ही ज्यांना प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी तसेच तांत्रिक मदतीची गरज असेल अशा प्रशिक्षणार्थींना ते दिले जाईल. या प्रशिक्षणादरम्यान विविध शासकीय योजनांची माहितीही देण्यात येणार आहे.
फोंडाघाट महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विष्णू फुलझेले म्हणाले की, ग्रामीण भागात बकरी म्हणून प्रसिद्ध असलेली शेळी उपजिविकेचे महत्त्वाचे साधन आहे. गाई म्हशी पालन व्यवसायांच्या तुलनेत शेळीपालन व्यवस्थापनाचा खर्च कमी येतो. शेळीपालन व्यवसायात खूप मोठी श्रीमंती असून याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेऊन प्रशिक्षणार्थींनी आपला व ग्रामीण भागाचा आर्थिक विकास साधावा.
आबूसाहेब पटेल आपल्या भाषणात म्हणाले की, फोंडाघाट परिसरात आजपर्यंत आपण अनेक सामाजिक उपक्रम राबविले असून यापुढेही ते राबविण्याचा आपला मानस आहे. कोणत्याही व्यवसायासाठी अर्थ साहाय्य देणारे वित्तीय संस्था प्रशिक्षण प्रमाणपत्राची मागणी करतात तेव्हा सर्व प्रशिक्षणार्थीनी हे प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करून वित्तीय साहाय्य मिळवावे व आपली आर्थिक प्रगती साधावी.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. केशव देसाई यांनी केले तर आभार राष्ट्रीय सेवा योजना विभागप्रमुख प्रा. डॉ. बालाजी सूरवसे यांनी मानले. यावेळी फोंडा पंचक्रोशीतील शेतकरी व सुशिक्षित बेरोजगार युवक उपस्थित होते.