*कोकण Express*
*फोंडाघाट राधाकृष्ण मंदिरातील “अखंड हरिनाम सप्ताह “चा शुभारंभ गुरुवार १५ सप्टेंबर रोजी*
*फोंडाघाट ः प्रतिनिधी*
गणपती बाप्पाच्या विसर्जनानंतर फोंडाघाट वासियांना वेध लागतात, ते राधाकृष्ण मंदिरातील “अखंड हरिनाम सप्ताह” चे ! भाद्रपद वद्य पंचमी ते एकादशी असा ऐन महालयात येणारा आणि पर्यटन जिल्हा सिंधुदुर्ग तील विविध उत्सवांचा शुभारंभ करणारा हा साप्ताहिक सोहळा, चालू वर्षी श्रीदेव राधाकृष्ण मंदिर – फोंडाघाट मध्ये गुरुवार तारीख १५ सप्टेंबर ते बुधवार तारीख २१ सप्टेंबर अखेर,सात दिवसांचा “अखंड हरिनाम सप्ताह” चे आयोजन श्रीदेव राधाकृष्ण मंदिर वैश्य समाजातर्फे करण्यात येत आहे. या कालावधीत विविध धार्मिक, सांस्कृतिक- संस्कारक्षम आणि पारंपारिक उपक्रमांचे आयोजन केले आहे. तरी सर्व भाविकांनी – चाकरमानी – माहेरवाशिणी यांनी कालावधीत उपस्थित राहून, सोहळा यशस्वीतेसाठी सहकार्य करावे असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे..
या निमित्ताने गुरुवार तारीख १५ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता , घटस्थापना- पूजाअर्चा- आरती- तीर्थप्रसादाने सप्ताहाची सुरुवात होईल आणि टाळ- मृदंगाच्या साथीने अन— हरिनामाचा गजर होतो फोंडा पेठेत | राधाकृष्ण माता आमची उभी देवळात — च्या घोषणांनी अबालवृद्ध राधाकृष्णाच्या नामस्मरणाच्या ठेक्यावर नाचू लागतील. विणाधारक सात दिवस, आळीपाळीने अहोरात्र हरिनाम उच्चारण करतील. दररोज सकाळी जीवन विद्या मिशन, शाखा- फोंडाघाट द्वारे उपासना यज्ञ, वारकरी संप्रदायाचा हरिपाठ, कलावती आई मंडळाचे भजन, मनोरंजक स्पर्धा, संध्याकाळी सुश्राव्य कीर्तन, विविध गुणदर्शन कार्यक्रम, रात्री स्थानिक भजन मंडळांना व्यासपीठ, शेवटच्या तीन रात्री विविध मंडळ- संस्था- शाळा यांचे आकर्षक चित्ररथ, रंगीत- संगीत दिंड्या, महिलांसाठी हळदीकुंकू इत्यादी विविध उपक्रम आयोजित केले आहेत. या सप्ताहात स्वर्गीय अण्णा कोरेगावकर आणि अनेक दिगंतांची अनुपस्थिती सदैव जाणवणार आहे.
या निमित्ताने सलग ८ वर्षी आर. के.ग्रुप फोंडाघाट तर्फे जिल्ह्यातील विविध नामांकित व स्थानिक भजन मंडळामध्ये, “संगीत भजन स्पर्धा २०२२” चे आयोजन तारीख १५ ते १७ या काळात होणार आहे. यासाठी प्रथम- १११११/- द्वितीय- ७७७७/- तृतीय- ५५५५/-आणि वैयक्तिक रोख बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. संपर्कासाठी भोगले -९४०४३९५०४२.
सप्ताहाची अंतिम तयारी पूर्ण झाली असून, विशेषतः सासुरवाशीणी,माहेरवाशींनी, वाड्यावरील अबालवृद्धांचा, बाजारपेठेतील वावर चैतन्यदायी आणि उत्साहवर्धक आहे. पेठेतील वर्दळीमुळे व्यापारी वर्ग ही सुखावला आहे. त्यानिमित्ताने एस. टी.स्टॅन्ड व सापळे पुला जवळील डिजिटल कमान लक्षवेधी आहेत. तर संपूर्ण बाजारपेठ, मंदिर मनमोहक विद्युत रोषणाईने आणि स्वागत फलकांनी सजली आहेत.तसेच मंदिरातील नंदू उचले यांच्या साऊंड सिस्टीमद्वारे वाजणारी प्रभातगीते,सनई, देवदेवतांचे अभंग आणि भावगीतांनी वातावरण अधिक भक्तिमय होत आहे.सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या आणि पर्यटन जिल्हा प्रवेशद्वार फोंडाघाट भाविकांसाठी सज्ज झाला आहे. सात दिवसांचे मंतरलेले क्षण अनुभवण्यासाठी, तसेच भक्ती- स्नेह- आदरातिथ्य आणि ईश्वरीय दृष्टांत यांचा अपूर्व संगम पाहण्यासाठी आणि सोहळा यशस्वी करण्यासाठी बालगोपाळ मंडळी सतर्क झाली आहे