कोकणातील वॉटर स्पोर्ट्सला दोन-तीन दिवसात परवानगी

कोकणातील वॉटर स्पोर्ट्सला दोन-तीन दिवसात परवानगी

*कोकण Express*

*कोकणातील वॉटर स्पोर्ट्सला दोन-तीन दिवसात परवानगी*

*माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे*

*मालवण ः प्रतिनिधी*

कोकणातील वॉटर स्पोर्ट्स व्यवसाय बंद असल्याने पर्यटकांची गैरसोय होत असल्याच्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी राज्याचे बंदरमंत्री अस्लम शेख यांच्याशी संपर्क साधत वॉटर स्पोर्ट्स सुरू करण्याबाबत चर्चा केली. त्यानुसार येत्या दोन-तीन दिवसात वॉटर स्पोर्ट्स सुरू करण्याची कार्यवाही केली जाईल असे आश्वासन श्री. शेख यांनी श्री. राणे यांना दिले आहे.
कोरोना महामारीमुळे कोकणातील पर्यटन व्यवसायास मोठा फटका बसला. अनेक तरुणांनी बँकांची कर्जे काढून पर्यटन व्यवसाय सुरू केला. अशा परिस्थितीत ऐन पर्यटन हंगामात मेरिटाईम बोर्डाने जलक्रीडा व्यवसायावर बंदी घातल्याने पर्यटन व्यवसायिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. यात जिल्हाधिकाऱ्यांनी जलक्रीडा व्यवसाय सुरू करण्याची परवानगी दिली असताना मेरिटाईम बोर्डाने जलक्रीडा व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश देत बंदर विभागामार्फत कारवाई करण्यास सुरुवात केल्याने पर्यटन व्यवसाय अडचणीत आला आहे.
या प्रश्ना संदर्भात काल खासदार नारायण राणे यांनी मेरिटाईम बोर्डाचे मुख्याधिकारी, प्रधान सचिव यांच्याशी संपर्क साधत कोकणातील वॉटर स्पोर्ट्सला परवानगी द्यावी अशी विनंती वजा सूचना केली होती. त्याला अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यानंतर रात्री श्री. राणे यांनी बंदरमंत्री अस्लम शेख यांच्याशी चर्चा केली. पर्यटनाच्या दृष्टीने वॉटर स्पोर्ट्स सुरू होणे महत्त्वाचे आहे. ज्या काही परवानग्या आवश्यक आहेत त्या मिळण्यासाठी मंत्रालय पातळीवर कोणतीही अडचण भासणार नाही. त्यामुळे वॉटर स्पोर्ट्स व्यावसायिकांना आवश्यक परवानग्या देत कोकणातील वॉटर स्पोर्ट्स तत्काळ सुरू करावेत असे सांगितले. त्यानुसार येत्या दोन-तीन दिवसात वॉटर स्पोर्ट्सला रीतसर परवानगी दिली जाईल असे आश्वासन श्री. शेख यांनी श्री. राणे यांना दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!