*कोकण Express*
*कृषि संशोधन केंद्र, फोंडाघाट येथे शेतकरी मेळावा व शिवारफेरीचे आयोजन*
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ अंतर्गत कृषि संशोधन केंद्र, फोंडाघाट हे २५ ऑगस्ट, १९४७ रोजी स्थापन झाले असून हे केंद्र गुरुवार दिनांक २५ ऑगस्ट, २०२२ रोजी स्थापनेचा अमृत महोत्सव साजरा करीत आहे. या केंद्राने आतापर्यंत भात जात विकसित करणे, भातासंबंधी नवनवीन तंत्रज्ञान विकसित करणे, भुईमुग, कडधान्य पीके आणि ऊस या सारख्या पिकांवर उल्लेखनीय कार्य केले आहे. गुरुवार दिनांक २५ ऑगस्ट, २०२२ रोजी या केंद्राने शेतकरी मेळावा व शिवारफेरीचे आयोजन केले आहे. या शेतकरी मेळाव्यामध्ये फलोत्पादनामधील संधी, नैसर्गिक शेती, एकात्मिक किड व्यवस्थापन, नॅनो युरीयाचे महत्व इत्यादी विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहे तसेच शेतकरी बांधवांसाठी शिवारफेरीचे सुद्धा नियोजन करण्यात आले आहे. केंद्रावरून सेवानिवृत्त झालेले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार यावेळी करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी श्री. प्रमोदजी जठार, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाचे कुलगुरू, संशोधन संचालक, संचालक विस्तार शिक्षण, आणि इतर मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. सदर शेतकरी मेळावा आणि शिवारफेरीचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. विजयकुमार शेटये, केंद्रप्रमुख यांनी केले आहे.