*कोकण Express*
*नितेश राणे गुन्हेगारी विश्वातील महामेरू ; संदेश पारकर*
*विनयभंग गुन्ह्यात दोषी असल्यास खरात वरही कारवाई करावी*
*महिलेचा सहारा घेऊन नितेश राणेंनी राजकारण करू नये*
*संदेश पारकर यांचा आमदार नितेश राणेंना टोला*
*कणकवली ः प्रतिनिधी*
देवगड येथे उमेद चे व्यवस्थापक शिवाजी खरात यांना रानभाजी कार्यक्रम महोत्सवाच्या वेळी आमदार नितेश राणे आणि त्यांच्या अंगरक्षकांनी तसेच राणे समर्थकांनी त्यांना मारहाण केली. आमदार नितेश राणे हे गुन्हेगारी विश्वातले महामेरू आहेत. वारंवार असे गुन्हे त्यांनी केले आहेत. काही गुन्ह्यांत ते जामिनावर सुटले आहेत. तो जामीन रद्द करावा, अशी आमची मागमी आहे. अशाप्रकारे दलित बांधवांवर अत्याचार होत असतील तर शिवसेना गप्प बसणार नाही, असा इशारा शिवसेना नेते संदेश पारकर यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे. तसेच शिवाजी खरात यांच्यावर असलेल्या विनयभंगाच्या आरोपाची चौकशी करून त्यात ते दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करावी, असेही पारकर यांनी स्पष्ट केले. कणकवली विजय भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजू शेटये, तालुकाप्रमुख शैलेश भोगले, राजू राठोड, ऍड. हर्षद गावडे, देवगड तालुकाप्रमुख मिलिंद साटम, योगेश राणे, सचिन आचरेकर, सिद्धेश राणे व इतर उपस्थित होते.
डंपर आंदोलनाच्या वेळी जिल्हाधिकारी कार्यालयावर राणे यांनी असाच हल्ला केला होता. त्यावेळी त्यांच्यावर सरकारी कामांत अडथळा आल्यामुळे ३५३ कलम लागलं होतं. मत्स्य अधिकाऱ्यांवर केलेली बांगडा फेक, हायवेच्या शाखा अभियंत्यांवरील चिखल फेक अशा अनेक कृत्यांमध्ये त्यांच्यावर गुन्हा नोंद आहे. राणेंच्या अशा वागणुकीमुळे कणकवली मतदारसंघ म्हणजे गुन्हेगारी मतदारसंघ अशी संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिमा तयार झाली आहे. शासकीय अधिकाऱ्यांना मारहाण करण्याच्या गुन्ह्यांमध्ये त्यांना मिळालेला जामीन रद्द व्हावा, ही शिवसेनेची मागणी आहे. शिवाजी खरात हे अनुसूचित जमातीतील असल्याने त्यांच्यावर राणेंनी हल्ला केला आहे. राणे हे सराईत गुन्हेगार आहेत. अशा प्रकारे अनुसूचित जाती जमातीच्या लोकांवर हल्ला केला तरी माझं कोणी वाकडं करू शकत नाही ही त्यांची वृत्ती आहे. अशाप्रकारे जर दलितांवर अत्याचार होत असतील, आणि त्यांची तक्रार पोलीस नोंद करत नसतील तर अस्ट्रोसिटीखाली त्या पोलीस अधिकाऱ्यांवर देखील गुन्हा दाखल होऊ शकतो. संतोष परब यांच्यावर झालेला हल्ला आणि आता शिवाजी खरात यांच्यावरील झालेला हल्ला हे वैयक्तिक वैमनस्यातून झालेले आहेत. शिवाजी खरात यांच्या जीवलाही धोका आहे. या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या विरुद्ध उभे राहणाऱ्यांना संपवण्याचा प्रयत्न नितेश राणेंकडून होत असल्याने खरात यांना पोलीस संरक्षण द्यावं, अशी मागणी आपण पोलिसांना केली असल्याचे पारकर म्हणाले. आमदार वैभव नाईक अधिवेशनात यावर आवाज उठवणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
प्रकाश सुर्वे यांनी शिवसैनिकांचे हातपाय तोडण्याचे केलेले भाष्य, आमदार बांगर यांनी शालेय आहार देणाऱ्या एजन्सीच्या कंत्राटदाराला मारहाण केली आणि इथे नितेश राणे यांनी केलेली मारहाण यावरून या सरकारला सत्तेचा माज आल्याचे दिसत आहे. हा माज शिवसेना उतरविल्याशिवाय राहणार नाही. राणेंची राडा संस्कृती संपविण्याचा विडा शिवसेनेने उचलला आहे. स्वतःच्या संरक्षणासाठी असलेल्या बॉडीगार्डला घेऊन जनतेवर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न राणे करत आहेत. शासकीय कर्मचाऱ्यांवर होत असलेल्या अत्याचारामुळे शासकीय कर्मचारी जिल्ह्यात यायला घाबरतात. अनेकजण बळी पडले असूनही भीतीने बोलत नाहीत. असे पारकर म्हणाले.
शिवाजी खरात यांवर विनयभंगाची तक्रार नोंद झाली आहे. त्याबाबत त्या अधिकाऱ्याची चौकशी व्हावी आणि त्यात ते दोषी आढळल्यास त्यांच्यावर कार्यवाही व्हावी, अशीही शिवसेनेची भूमिका आहे. महिलांवर अन्याय होत असेल तर आरोपींना पाठीशी घालण्याची सेनेची भूमिका नाही. मात्र नितेश राणेंनी महिलांच्या आडून अशाप्रकारचं राजकारण करू नये. खरंतर मारहाणीचा गुन्हा दाखल होऊ नये यासाठी नितेश राणेंनी त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करायला भाग पाडलेलं आहे. त्यामुळे या प्रकरणाचीही चौकशी व्हावी. देवगड नगरपंचायत, पंचायत समिती देवगड , कृषी विभाग देवगड आणि उमेद यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित केला असल्यामुळे तालुक्याचे बीडीओ, कृषी अधिकारी, उमेदचे अधिकारी या साऱ्यांची चौकशी व्हावी. अधिकारी चुकीच्या पद्धतीने वागत असेल तर त्याची चौकशी करण्यासाठी न्यायालय, पोलीस आहेत. पण स्वतः कायदा हातात घेऊन मारहाण, शिवीगाळ आणि धमकी देणाऱ्या करणाऱ्या नितेश राणे यांनी आपण न्यायाधीश नाही हे ध्यानात ठेवावं, असं पारकर म्हणाले.
अन्यायग्रस्तांची तक्रार पोलीस नोंद करून घेत नसतील तर त्यांच्यावरही गुन्हा दाखल व्हावा असं आमचं स्पष्ट मत आहे. अशा गुन्हेगारी प्रवृत्ती ठेचून काढण्यासाठी शिवसेना सज्ज आहे. जर गुन्हा नोंद केला नाही तर शिवसेना आंदोलन करेल आणि गुन्हा दाखल करायला भाग पाडेल, असे शिवसेना जिल्हाध्यक्ष संजय पडते म्हणाले.
